मुक्ताईनगर येथे खुलेआम मासे विक्री; मटन मार्केट ठरतेय् ‘शो-पीस’

0
17

मुक्ताईनगर ः प्रतिनिधी

मुक्ताईनगर तालुका हा संतांची भूमी म्हणून पूर्ण महाराष्ट्रात व जगात ख्याती असलेला म्हणून ओळखला जातो तसेच जनता कोरोनाच्या संकटातून बाहेर येत नाही तोच ब्लड फ्लूच्या रोगाने तोंड वर काढलेले आहे. अशी परिस्थिती असताना सुद्धामुक्ताईनगर शहरामध्ये खुलेआम मासे विक्री केली जात आहे.

मागील ग्रामपंचायतच्या काळामध्ये लाखो रुपये खर्च करून ग्रामपंचायतने या मास विक्री व मटन विक्री करणार्‍यांसाठी व्यापारी संकुल जुने गाव येथील आठवडे बाजारात बांधले आहे. परंतु ते मटन मार्केट शो-पीस म्हणून ठरत आहे काय? असा प्रश्न मुक्ताईनगर शहरातील, तालुक्यातील व राज्यातील येणार्‍या भाविक भक्तांना पडलेला आहे. तसेच मुक्ताईनगर नगरपंचायत मास विक्रेत्यांवर थातूरमातूर नोटिसा काढून पुढील कारवाई मात्र शून्य ठरत आहे.

मास विक्री करणार्‍या प्राण्यांचा उरलेला लगदा अथवा जठार पायाचे खुरे व त्यावरील उरलेले घाण पिसे वगैरे पूर्णा नदीच्या पात्रात खुलेआम फेकले जात असून नगरपंचायत प्रशासन भाविकांच्या भावनेशी खेळत आहे. असे असताना सुद्धा जुन्या मुक्ताबाईकडे व जे.ई.स्कूलकडे जात असताना रस्त्यावरच खुले मासे विक्री केली जात आहे. मुक्ताईनगर शहरातील अनेक संघटनांनी व वारकरी संप्रदाय तसेच जैन संघटनांनी तहसीलदार व नगरपंचायत प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिले. तरी सुद्धा प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे. खुलेआम मास विक्री करणार्‍यांवर नेमका वरदहस्त कोणाचा, प्रशासनाला ते का जुमानत नाही, यामागचे गौडबंगाल तरी काय? प्रशासन मुक्ताईनगर नगरपंचायत कारवाई करणार का? याकडे मुक्ताईनगर येथील नागरिकांचे व भाविकांचे लक्ष लागून आहे. तसेच मुक्ताईनगर येथील नवीन गावालगत बर्‍हानपूर रोडवरील असलेल्या स्मशानभूमीच्या जवळच बर्‍याच दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फूटलेली आहे. त्यामधून हजारो लिटर पाणी वाया जात असून त्या ठिकाणी मोठा पाण्याचा डबका साचलेला असून त्या डबक्यामध्ये जमीन ओली असल्यामुळे बाहेर फिरणारे गुरे व जनावरे त्यात बसून राहतात व तसेच जनावरे मरून पडलेले आहे. नळ गेल्यावर त्या डबक्यातील पाणी पुन्हा त्या पाईपमध्ये परत जाऊन तेच घाण पाणी मुक्ताईनगर वासियांना पिण्यासाठी पुरविले जात आहे. यावर कुंभकर्ण  झोपेत असलेली मुक्ताईनगर नगरपंचायत जागी होईल का? असाही प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.

याबाबत नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाला लक्षात आणून दिले व मुक्ताईनगर येथील नगरपंचायतला प्रसारमाध्यमांद्वारे जागृत करण्याचा प्रयत्न केला जात असून सुद्धा याकडेही मुक्ताईनगर नगरपंचायत कानाडोळा करून लक्ष देत नाही, असे दिसून येत आहे. यासंदर्भात संबंधित वरिष्ठ अधिकारी व जिल्हास्तरावरील अधिकारी व जिल्हाधिकारी तसेच स्थानिक आ.चंद्रकांत पाटील तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील लक्ष देतील का व कारवाई करतील का तसेच केव्हा करतील याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे

बर्ड फ्ल्युचे थैमान संपूर्ण जगात पसरत आहे, अशी परिस्थिती असताना सुद्धा प्रशासन का दिरंगाई करताना दिसून येत आहे यासंदर्भात नवापूर, नंदुरबार, धुळे, अकोला, बुलढाणा, नगर या जिल्ह्यातील पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांचे बर्ड फ्लूने मृत्यू झालेला आहे, असे समजते. तसेच तीन दुकाने सील करण्यात आलेले आहे, असे समजते. २००६ मध्ये  अशाच बर्ड फ्लूमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. एकीकडे शासन सांगत आहे मास चांगले शिजवून खा, परंतु कोंबडीचे बहुतांशी मासाचे तुकडे  पूर्णा नदीच्या पात्रात फेकले जात आहे. त्या लगतचे मांसाचे तुकडे पशुपक्षी खाण्यासाठी धडपडत असून अर्धवट खाल्लेले मास पूर्णा नदीच्या पात्रात फेकले जाऊन पूर्णा नदी दूषित होताना दिसून येत आहे व बर्ड फ्लूचे संसर्ग रोगामुळे आजार होऊन शहरातील नागरिकांच्या जिवाशी खेळले जात आहे.

बर्ड फ्ल्यूच्या थैमानाला अनुसरून भोपाळ येथील प्रयोगशाळेने उत्तर महाराष्ट्रातील जलसाठे हाय अलर्टवर असल्याचे निर्देश  दिले आहे, असे असताना सुद्धा मुक्ताईनगर शहरातील मांस विक्रेते उरलेले मांस पूर्णा नदीच्या पात्रात खुलेआम फेकत असून नगरपंचायत व मुख्याधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहे. याबाबत आतापर्यंत एकही कारवाई मुख्याधिकारी यांनी केलेली नाही. बर्ड फ्ल्यूूचे थैमान रोखण्यासाठी मुख्याधिकारी उपाययोजना करतील का, नागरिकांच्या जीवाशी खेळणे थांबवतील का की फक्त वसुलीकडे लक्ष देऊन मुक्ताईनगर येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणार की काही  उपायोजना करणार का?

पुरुषोत्तम वंजारी यांनी सांगितले की, खुले मास विक्री करणे  चुकीचेच आहे. मुक्ताई पालखी सोहळा त्याच रस्त्यावरून पायी जात असून भाविकांच्या भावनेचा अनादर होत आहे. शाळेत जाणारी लहान मुले यांच्या मनावर विपरीत परिणाम  होताना दिसून विपरीत बुद्धी त्यांच्या मनात घर करत आहे.

मुक्ताई संस्थान कोथळी व्यवस्थापक उद्धवजी हरणे महाराज यांनी सांगितले की, वारकरी संप्रदायातील चारधामापैकी मुक्ताईनगर एकधाम असल्याने हजारो भाविक संत मुक्ताबाई दर्शनास येतात. वारकरी पंथात  शाकाहारास  अनन्य स्थान आहे. शहरात आल्यावर उघड्यावरील मांसविक्री पाहून मन विचलीत होते. मनस्ताप होतो, असे अनेक भाविक नेहमीच तक्रार करतात. कायद्यानुसार मास विक्री उघड्यावर बंदी असताना अंमलबजावणीत कसूर का? मुक्ताईनगरचे नावलौकिकात असे दृश्य  निश्चितच योग्य नाही.

जैन संघटनेचे तालुकाध्यक्ष नितीन जैन यांनी सांगितले की, ग्रामपंचायतच्या काळामध्ये खुले मासेविक्री यासंदर्भात २००४ मध्ये नितीन जैन व सहकारी तीनदिवसीय उपोषण करून आम्हाला लेखी आश्वासन देऊन उपोषण सोडण्यात आले होते. यापुढे खुले मास विक्री होणार नाही. झाल्यास आम्ही तात्काळ कारवाई करू. परंतु ग्रामपंचायतच्या काळामध्ये पुष्पाताई केवलकर सरपंचपदी विराजमान असताना त्यांनी लागलीच साधारण अंदाजे चार लाख रुपये मटन मार्केटसाठी उपलब्ध करून दिला होता व मटन मार्केट बांधण्यात आले होते. या मटण मार्केटमध्ये एक ते दीड वर्ष साधारणता मासे विक्रीसाठी दुकानदार बसू लागले होते. परंतु काही दिवसाने बोगस राजकारणामुळे हे दुकानदार मेन रस्त्यावर बसू लागले. वारंवार निवेदन देऊन सुद्धा आजतागायत कुठलीही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. तसेच पावन संत भूमी असून या ठिकाणी तरी खुले मास विक्री होऊ नये. ज्याठिकाणी शासनाने यांना मास विक्रीची लाखो रुपये खर्च करून दुकाने बांधून दिलेली आहे त्याठिकाणी यांनी मास विक्री करण्यास बसावे.

मुख्याधिकारी यांच्याशी ‘साईमत’ प्रतिनिधीने संपर्क साधला असता मोबाईल संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे, असे समजते. मोबाईल टेक्निशियन  माहिती घेतली असता ‘साईमत’ प्रतिनिधीचा मोबाईल रिजेक्ट लिस्ट मध्ये टाकण्यात आल्याचे समजते. सर्वसामान्यांच्या अडचणींवर उत्तरे देण्यात असमर्थ ठरलेल्या मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड भ्रमणध्वनी ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची पळवाट यांनी का काढली? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

खुले मास विक्री करणार्‍यांवर आम्ही भरपूर वेळा नोटिसा दिल्या परंतु ते ऐकत नाही. आम्ही एक वेळा त्यांना सूचना देऊ व त्यांना मटन मार्केट ठिकाणी मास विक्री करायला बसायला सांगू तसे न केल्यास आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई  करणार

नजमा तडवी

नगराध्यक्ष

स्वच्छ भारत सुंदर भारत जरी ही संकल्पना सरकार देशामध्ये राबवत असली तरी मुक्ताईनगरसाठी ही संकल्पना फक्त कागदोपत्री ठरत आहे. मुळात कृतीमध्ये प्रशासन शून्य ठरत आहे. जागोजागी घाणीचे ढीग आढळून येत आहे.

मुक्ताईनगरमध्ये आठवड्याचा बाजार हा रविवारी जुने गाव या ठिकाणी भरत असून बाजार तालुकास्तरावरचा बाजार असून मोठ्या प्रमाणात भरत असतो. त्यात खुलेआम मांस विक्री होत असते. त्याच बरोबर कोंबडीचे तसेच झिंगे, बोंबील अथवा मासे जास्त प्रमाणात विक्री होत असून कापलेल्या मास बरोबरची घाण जनावरांचे खुरे जनावराच्या पोटातील विष्ठा, लगदा, मासाहार विकणारे दुकानदार समोरच असलेल्या हिंदू दफन भूमीमध्ये फेकत असून यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकते. तसेच हिंदू धर्मामध्ये मन दुखावले जाऊन संताप व्यक्त  केला जात आहे. याकडे नगरपंचायत प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here