मुंबई : प्रतिनिधी यास्मिन शेख
मुंबै बँकेतील घोटाळा (Mumbai Bank Scam Case) य़ाप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडून सुरू असलेल्या चौकशीत शहरातील २५ मजूर संस्थांची बँक खाती सील करण्यात आली आहेत.
या संदर्भात उल्लेखनीय आहे की, बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत भाजपाचे नेते व विधानपरिषदेतील विरोधी प्रवीण दरेकर हे मजूर मतदार संघातून, मजूर म्हणून निवडून येत असतात.
संचालक मंडळाने एकाच दिवशी मंजुरी दिलेल्या ७४ मजूर संस्था बोगस असल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. यापैकी सुमारे सात-आठ प्रकरणांत चौकशी पूर्ण करून आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एका प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
मुंबै बँकेतील घोटाळय़ाप्रकरणी दाखल असलेल्या तक्रारीची चौकशी आर्थिक गुन्हे विभागाकडून गेले काही वर्षे सुरू आहे. त्यात २०११-१२ मध्ये एकाच दिवशी ७४ मजूर संस्थांना मंजुरी दिल्याचे एक प्रकरण आहे. आर्थिक गुन्हे विभागाचे विद्यमान सहआयुक्त निकेत कौशिक यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर या चौकशीला वेग आला आहे. आतापर्यंत झालेल्या चौकशीत मजूर संस्था बोगस असल्याचे आढळल्याने आरोपपत्र दाखल केले आहे, असे कौशिक यांनी सांगितले.
मजूर म्हणून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व आमदार प्रवीण दरेकर यांना विभागीय सहनिबंधकांनी अपात्र ठरविल्यानंतर, या मजूर संस्थांमध्ये असलेले सभासद खरोखरच मजूर आहेत का, याची तपासणी करण्याची गरज आहे, असे आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे म्हणालेत. मजूर संस्थांकडून होणारे घोटाळे रोखायचे असतील तर मजूर संस्थांना कामे देताना त्यांच्याकडून आधारकार्ड, पॅन कार्ड, बँक, पासबुक आणि मजूर असल्याचा दाखला घेतला पाहिजे. म्हाडा व सार्वजनिक बांधकाम विभागांकडून मजूर संस्थांना कोटय़वधी रुपयांची कामे दिली जातात,असे म्हाडातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.