जळगाव ः विशेष प्रतिनिधी
जळगाव शहरासह संपूर्ण जिल्हा आणि सार्या महाराष्ट्रात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. जळगावबद्दल सांगायचे झाले तर जिल्ह्यात सद्यस्थितीत दररोज एक हजारावर रुग्ण संख्या आढळून येत असून मृत्यूचे प्रमाणही वाढल्याने स्थिती अत्यंत गंभीर झालेली आहे.दरम्यान या कोरोना महामारीचा संसर्ग थांबावा,प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने कठोर प्रतिबंध लागू केलेले आहेत.कोरोनाचा संसर्ग गर्दीमुळे व गर्दीत होतो हे गृहीत धरून गर्दी टाळण्यासाठी विवाह सोहळे,अंत्य यात्रा आदींवर उपस्थितांसाठी मर्यादा घालण्यात आली असून उल्लंघन कारणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
देशासह राज्यात आणि जिल्ह्यातही कोरोनाचा कहर गेल्या म्हणजे २०२० च्या मार्च महिन्यापासून सुरू झाला आणि तो ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान काही प्रमाणात आटोक्यात आला होता .बंद व्यवस्थापने ,कंपन्या,प्रतिष्ठाने ,मॉल्स, बाजारपेठा, उद्योग धंदे ,सिनेमा-नाट्य गृहे,जलतरण तलाव,क्रीडांगणे,उद्याने ,खाजगी बस प्रवास ,शिक्षण संस्था आदी काही प्रमाणात सुरू झाल्या होत्या.सर्वांचीच विस्कटलेली आर्थिक गाडी रुळावर येण्यास काही प्रमाणात सुरुवात झालेली असतांनाच या फेब्रुवारीपासून कोरोनाच्या दुसर्या लाटेचा कहर सुरू झाला व सर्यांच्याच पोटापाण्याचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे .
उल्लेखनीय की, गेल्या वर्षांपासून लग्न (विवाह सोहळे)समारंभ आणि त्याअनुषंगाने होणारी सारीच मजा कोरोनाने हिरावून घेतली आहे.लग्न समारंभासाठी जिल्हा प्रशासन व राज्यशासनाकडून वर्हाडी मंडळींच्या उपस्थितीवर मर्यादा घालण्यात आल्याने विवाह सोहळे अगदी साध्या पद्धतीने मोजक्या (५०)लोकांच्या अर्थात नातलग मंडळींच्या उपस्थित संपन्न झाले किंवा करणे भाग पडले आहे .
विशेष म्हणजे विवाह सोहळ्यांशी संबंधित टेंट (मंडप)डेकोरेशन, बँड वाले, घोडे वाले, फोटोग्राफर, आचारी – केटरर्स मंडळी, मंगल कार्यालय, हॉल्स, लॉन्स, आदी सर्यांच्याच व्यवसायाची घडी पार विस्कटून गेली आहे. आणि त्यांच्यावर उपजीविका करणार्या शेकडो- हजारो लोकांची रोजीरोटी हिरावली गेली आहे. गेल्या दिवाळी नंतर कोरोना काही प्रमाणात नियंत्रणात आल्याने या व्यवसायिकांना थोडे चांगले दिवस आले होते.परंतु फक्त दोनच महिन्यात कोरोना रिटर्न झाला व राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने संसर्ग रोखण्यासाठी पुन्हा कडक निर्बंध लादले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव व संसर्ग रोखण्यासाठी गर्दीत जाणे टाळा व गर्दी टाळा असा संदेश दिला गेला आहे .बाजारपेठेत गर्दी होते म्हणून प्रत्येक दुकानदारांना सोशल डिस्टनसिंग पाळा सांगण्यात आले आहे.जसे मास्क न लावणार्यांंना दंड आकारण्यात येतो त्या प्रमाणेच ज्या-ज्या दुकानात ग्राहकांची गर्दी दिसेल त्या दुकानदारांना दंड केला जातो आहे. त्याचप्रमाणे विवाह सोहळ्यात गर्दी होते म्हणून त्या सोहळ्यांना ५० नातलग-वर्हाडी मंडळीच्या उपस्थितीत अनुमती देण्यात आली आहे.आपल्याकडे जसे लग्न समारंभांना महत्व तितकेच महत्व कुणाच्याही अंत्ययात्रेत जाण्यास महत्वाचे मानले जाते. जशी ज्याची लोकप्रियता व जसा समाज किंवा जितका जन-संवाद तितकी त्या व्यक्तिच्या अंतिम यात्रेस उपस्थिती ठरलेली असते.सत्य आहे की,काहींच्या अंत्ययात्रेस हजारावर लोक सामील असतात .आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता फक्त २० लोक अथवा नातलगांच्या उपस्थितीस अनुमती आहे .
आपल्याकडे जितके महत्व लग्नाचे त्यापेक्षा जास्त कुणाच्याही अंत्य यात्रेचे मानले जाते .पण कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून त्या अंत्ययात्रेच्या उपस्थितीवर सुद्धा मर्यादा घातल्या गेल्याने लोकांनी खंत व्यक्त केली आहे.राज्य शासन असो किंवा जिल्हा प्रशासन यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळल्यास लग्न समारंभ व अंत्य यात्रेस उपस्थितीवर मर्यादा घातली ते योग्यच म्हणावे.कारण गर्दीमुळे संसर्ग व रोगांचा प्रादुर्भाव होतो हे सिद्ध झाले आहे.परिणामी शासन व प्रशासनाच्या आदेशांचे पालन सारेच करू लागले आहेत.गर्दी टाळू लागले आहेत.याचा नियमभंग कारणार्यांवर दंडात्मक कारवाई होते म्हणून आयोजक व लोकांनीही त्याचा धसका घेतला आहेच .
दरम्यान विवाह सोहळ्यांना ५० लोकांच्या व अंत्य यात्रेसाठी २० लोकांच्या उपस्थितीची मर्यादा घालून दिली असतांना आणि बाजारपेठेत दुकानदारांना गर्दी झाली या कारणाने दंड भरण्यास भाग पाडले जात असताना दारूच्या दुकानांवर होणार्या प्रचंड गर्दीवर लोकांनी बोट उचलले आहे .
गेल्यावेळी दारूची दुकाने जवळपास दोन महिने बंदच होती,परिणामी मद्यपी व मद्यप्रेमी मंडळींना ३५ रुपयांच्या नाइन्टीनसाठी १५० ते २०० रुपये मोजावे लागत होते व जशी दुकाने सुरू झाली तशी त्या दुकानांवर गर्दी तुटली होती की , विचारू नका.ज्याप्रमाणे पूर्वी सिनेमा थिएटरवर तिकीट काढण्यासाठी प्रेक्षकांच्या उड्या पडायच्या तसेच दृश्य प्रत्येक दारू दुकानासमोर होते.शिवाजी रोडवरील दोन दुकाने व जिल्हा रुग्णालयाच्या शेजारच्या बोळीतील दुकानांवर तर ट्रॅफिफ जाम होण्यापर्यंत मद्यपींची गर्दी होती .तेव्हा कोरोना त्या गर्दीत चिरडून मेला असावा .
आताही गेल्या मार्च महिन्यात १२,१३ व १४ रोजी आणि होळीच्या पार्श्वभूमीवर २८,२९ व ३० मार्च रोजी जनता कर्फ्यु पाळला गेला .त्याची आधीच पूर्वसूचना दिली गेल्याने मद्यपींनी सार्या दारू दुकानांवर प्रचंड गर्दी केली होती आणि आता ४ आणि ५ एप्रिल रोजी पुन्हा लॉकडाऊन लागेल,ते २५ दिवसांचे असेल अशा चर्चा किंवा अफवा झाल्याने सर्व दारू दुकानांवर ओव्हर फ्लो गर्दी झाली.तिथे ना मास्क,ना सोशल डिस्टनसिंग ,ना नियमांचे पालन.
वरील दृश्य पाहून लोकांचा प्रश्न साहजिकच आहे की, विवाह सोहळ्यांना ५० लोक,अंत्य यात्रेसाठी २० लोकांची मर्यादा .त्याचप्रमाणे दाणा बाजार,फुले मार्केट,सेंट्रल फुले मार्केट.आणि बाजारपेठेत दुकानांवर गर्दी दिसली ,सोशल डिस्टनसिंगचा फज्जा दिसला की प्रशासन त्या -त्या दुकानदारांना दंड ठोकते.मग दारूच्या दुकानांवर गर्दीची कोणत्याच मर्यादा नाहीत काय? की त्याठिकाणी कोरोनाचा संसर्ग होत नाही ,की त्या ठिकाणी कोरोनाचे विषाणू अगदीच ‘‘फिट‘‘झालेले असतात?.महाशय जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनीच या लोक भावनांचा आदर करून गर्दी करणारे,सोशल डिस्टनसिंगचा नियम पायदळी तुडविणार्या दारू दुकानांवरही कारवाईचा बडगा उगारावा,त्यांनाही नियमांची जाणीव करून द्यावी अशी मागणी आहे.