महावितरणचा महादिलासा : उच्चांकी मागणीएवढा अखंडित वीजपुरवठा

0
41

जळगाव ः प्रतिनिधी

कोळसा टंचाई व इतर कारणांमुळे देशव्यापी वीजसंकटामध्ये 15 राज्यांत भारनियमन होत असताना महाराष्ट्रात आठवडापासून अखंडित वीजपुरवठा करण्यात येत आहे. महावितरणच्या प्रभावी नियोजन व उपाययोजनांमुळे गेल्या शुक्रवारपासून राज्यात कुठेही भारनियमन करण्याची वेळ आली नाही. ही परिस्थिती गुरुवारीही (28 एप्रिल) कायम होती. या कामगिरीसाठी ऊर्जामंत्री ना.डॉ.नितीन राऊत यांनी महावितरण व महानिर्मिती या दोन्ही कंपन्यांचे कौतुक केले आहे.

शुक्रवारी मध्यरात्रीपासून (दि. 22) गुरुवारपर्यंत (दि. 28) महावितरणने राज्यात सर्व वीजवाहिन्यांवर अखंडित व सुरळीत वीजपुरवठा केला आहे. गुरुवारी मुंबई वगळून उर्वरित राज्यात महावितरणने 24 हजार 7 मेगावॅट या आजपर्यंतच्या सर्वोच्च मागणीइतका वीजपुरवठा केला. ऊर्जामंत्री ना.डॉ.नितीन राऊत यांनी या कामगिरीबद्दल महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांचे कौतुक केले आहे.

तसेच महानिर्मितीनेही राज्यातील सर्व 27 संच कार्यान्वित करून वीजनिर्मिती वाढवली आणि अखंडित वीजपुरवठ्याच्या महावितरणच्या प्रयत्नांना साथ दिली. याबद्दल ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांनी महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांचेही कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here