मुबई : प्रतिनिधी
“सोलापूर जिल्ह्यातील सुरज जाधव या तरुण शेतकऱ्यानं विजेचं कनेक्शन कापल्यानं फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केली. हा प्रश्न आम्ही विधानसभेत मांडला. सरकारनं शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कापावी, अशी मागणी केली. हे सरकार कोडगं, असंवेदनशील आहे. हे सरकार बिल्डरांचं आहे, हे सरकार बेवड्यांकरता धोरण तयार करतं. शेतकऱ्यांना नापिकी आणि इतर कारणांनी वीज कनेक्शन कापू नका अशी विनंती केली होती. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी वीज कनेक्शन मे पर्यंत कापणार नाही, असं म्हटलं होतं. परंतु, उपमुख्यमंत्र्यांच्या शब्दाला ऊर्जा मंत्र्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कापलं जातंय. काही शेतकऱ्यांनी वीज बील थकवलं तरी डीपी काढून नेलं जात आहे. रब्बीचा हंगाम खराब झाला आता खरिपाचा हंगाम खराब होणार अशी स्थिती आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. हा असंतोष सभागृहात मांडत होतो,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.