मलकापूर ः प्रतिनिधी
येथील रेल्वे स्थानकासमोर असलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या ठिकाणी पुर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बुलडाणा जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.अशोक सुरडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राव्दारे केली होती.
त्या पत्राची दखल घेत शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा उभारणी संदर्भात जिल्हाधिकारी यांनी निर्णय घ्यावा, असे आदेश एका पत्राद्वारे राज्याच्या सामान्य प्रशासन विभाग मंत्रालयाचे कार्यासन अधिकारी सु.ज.तुमराम यांनी दिले आहेत. विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर रेल्वे स्थानकासमोर भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा परिसरात सुशोभिकरणासह आदी कामे करण्यात आलेली आहेत. तहसील चौक ते रेल्वे स्थानक या रस्त्याचे काम झाल्याने रस्ता हा उंच झाल्याने भविष्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील जागेमध्ये पाणी साचून नुकसान पोहचू शकते व घाणही साचू शकते. त्यामुळे अर्धाकृती पुतळ्याच्या ठिकाणी पुर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन डॉ.अशोकराव सुरडकर यांनी वेळोवेळी संबंधित विभाग व प्रशासन यांच्याकडे दिले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही त्यांनी याबाबत मागणी केली होती.
या पत्राची दखल घेत राज्याच्या सामान्य प्रशासन विभाग मंत्रालयाने एका आदेशान्वये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उभारणीबाबत शासनाच्या 2 मे 2017 व 6 मे 2017 च्या अनुषंगाने मार्गदर्शक तत्वे निश्चित करून पुतळा उभारणीचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. त्यास अनुसरून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी बुलडाणा जिल्हाधिकारी यांना निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.