जळगाव : प्रतिनिधी
विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल येथे माध्यमिक विभागामध्ये ‘मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त’ ‘साहित्यिक आपल्या भेटीला’ या सदरात सुप्रसिद्ध साहित्यिक आणि इयत्ता सातवीच्या बालभारती पुस्तकातील ‛स्वप्न विकणारा माणूस’ या पाठाचे लेखक ज्येष्ठ साहित्यिक अशोक कोतवाल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तर यावेळी विद्यार्थ्यांसाठी स्वरचित काव्यवाचन स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे परीक्षण ब.गो. शानभाग विद्यालयाच्या मराठीच्या शिक्षिका अनुराधा देशमुख यांनी केले.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते थोर साहित्यिक कविवर्य वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर भूषण खैरनार यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी ही माय भूमी, ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमुची हे मराठी भाषा गौरव गीत सादर केले.या गीताला विद्यार्थ्यांनी बासरी,तबला, पेटी सह अन्य वाद्यांची सुरेल साथ दिली. या गीता नंतर कविता सूर्यवंशी यांनी प्रमुख अतिथी अशोक कोतवाल यांच्या साहित्य प्रवासाचा परिचय करून दिला. त्यानंतर प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील यांनी पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन प्रमुख अतिथींचे तर समन्वयक गणेश लोखंडे यांनी परीक्षक अनुराधा देशमुख यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रम प्रमुख अनुराधा धायबर यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं आणि त्याच बरोबर प्रासंगिक स्वरचित कविता सादर केली.प्रास्ताविका नंतर दोन गटांमध्ये स्वरचित काव्यवाचन स्पर्धेला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी काव्यवाचनातून विविध सामाजिक विषय हाताळत,सुंदर शब्दांची गुंफण करत आपल्या काव्यप्रतिभेची चुणूक दाखविली. यात या बाल साहित्यिकांनी आपले भावविश्व उलगडत ‘आई’ ‘मित्र’ ‘झाड’ ‛निसर्ग’ ‛बाबा’ ‛शिक्षक’, ‘कोरोना’, ‛आजी’, ‛भाऊ-बहीण’, ‛कधी असही करून बघावं’ अशा विविध विषयांवर सुरेख कविता सादर करत सगळ्यांची टाळ्यांची दाद मिळवली. यावेळी शुभदा नेवे यांनी ‛मोबाइल वरची शाळा’आणि शाळेचे कर्मचारी उमेश सोनवणे यांनी‛स्त्री’ या कवितेचं उत्स्फूर्त पणे वाचन केले.परीक्षकांनी स्वरचित काव्य वाचन स्पर्धेचा निकाल घोषित केला.आणि आपले मनोगत सादर केले.
ज्येष्ठ साहित्यिक अशोक कोतवाल यांनी आपल्या मनोगतातून सुरुवातीला, विद्यार्थ्यांना विविध सुप्रसिद्ध कवींच्या कवितांचे दाखले देत आपण कसे घडलो याविषयी गुपित उलगडले. मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा यावा म्हणून शाळेतच प्रयत्न व्हायला हवेत असे त्यांनी यावेळी सांगितले.आपल्या शालेय जीवनात असतांना शाळेमध्ये एकदा वसंत बापट, मंगेश पाडगावकर, आणि ना. धो. महानोर या थोर साहित्यिक त्रयी आले होते आणि त्यांचे साहित्य ऐकून आपण भारावून गेलो त्याच बरोबर ना धो महानोर यांच्या कवितेची नक्कल करत आपण पहिली कविता लिहिली असा अनुभव त्यांनी सांगितला. जीवनात स्वप्न बघितली पाहिजे आणि ती स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे,वाचनाने जीवन समृद्ध होतं आणि आपण इतरांपेक्षा वेगळे घडतो. हे गुपित त्यांनी सांगितले. आपल्या पाठ्यपुस्तकात एक धडा असलेले साहित्यिक आपल्या समोर आलेले पाहून विद्यार्थ्यांना देखील खूप आनंद झाल्याचे चित्र या वेळी बघायला मिळालं. मराठी राजभाषा दिन गौरव सोहळ्याच्या निमित्ताने कलाशिक्षक दत्तात्रय गंधे आणि योगिता सोळंके यांनी शाळेचा परिसर सुप्रसिद्ध साहित्यिकांच्या कवितांनी सजविला होता. मराठी सुविचार, मराठी भाषेची चिन्ह आणि महत्त्व या मराठी भाषेच्या आभूषणांनी परिसर सजविण्यात आला होता, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या द्वारे सुरेख रांगोळ्या, फलक लेखन करण्यात आले होते. शिक्षक आणि काही विद्यार्थ्यांनी मराठी पारंपारिक वेशभूषा पेहराव करून भगवे फेटे बांधण्यात आले होते. हर्षदा उपासनी यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरद कुलकर्णी, सायली पाटील, आनंदी याज्ञिक आणि रोहित पाटील या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी कीर्ती नाईक यांनी आभार प्रदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे मान्यवरांनी कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
स्वरचित काव्यवाचन स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे
मोठा गट (आठवी ते दहावी) – प्रथम क्रमांक -मानसी रवींद्र बडगुजर द्वितीय क्रमांक -तन्मेष अरुण कापुरे तृतीय क्रमांक -कुणाल निलेश काटोले उत्तेजनार्थ -इशिता शाम सटाले
लहान गट (पाचवी ते सातवी) प्रथम क्रमांक- आर्या प्रवीण कुलकर्णी द्वितीय क्रमांक -योगिता गणेश पाटील तृतीय क्रमांक -संहिता संदीप जोशी उत्तेजनार्थ -विराज पंकज सोनवणे