पाचोरा : प्रतिनिधी
शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या मोबाइल दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून दुकानातील एकूण ३८ हजार रुपये किंमतीचे मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, अक्षय अशोक जैन (वय-२३) रा. रंगार गल्ली पाचोरा हे कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. अक्षय जैन यांचे पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ अथर्व मोबाईल नावाचे मोबाइल दुकान आहे. मोबाईल विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात. दरम्यान २७ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता नेहमीप्रमाणे ते दुकान बंद करून घरी गेले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकावून दुकानातील एकूण ३८ हजार १९० रुपये किंमतीचे मोबाईल चोरून नेल्याची सोमवारी २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता समोर आले आहे. यासंदर्भात अक्षय जैन यांनी पाचोरा पोलिस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विनोद शिंदे करीत आहे.