चोपडा ः प्रतिनिधी
मध्यप्रदेश इको पर्यटन विकास बोर्ड, भोपालद्वारा विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी निसर्गाविषयी प्रशिक्षण व जागरूकता हेतु एक दिवसीय इको अनुभूती शिबिर आयोजित करण्यात येते. बडवानी जिल्ह्यातील शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयाच्या 260 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी चोपडा तालुक्यातील नाटेश्वर-अनेर डॅम येथे आयोजित या शिबिरात सहभाग घेतला. शिबिरात विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी येथील सातपुडा निसर्ग संवर्धन संस्थेचे वने व वन्यजीव संवर्धक हेमराज पाटील प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धनाविषयी प्रेरित करतांना वृक्षारोपण, सीड बँक व सीड बॉल्स तयार करणे, पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरा करणे, फुलपाखरू निरीक्षण, नोंदी व महत्त्व, पक्षी निरीक्षण व पक्ष्यांची स्थिती, पक्षी स्थलांतर, पक्षी व वन्यजीव सप्ताह, वने व वन्यजीव संवर्धनाचे महत्व, जागतिक चिमणी दिवस, वन्यजीव प्रगणना, संकटग्रस्त प्राणी-पक्षी, मानव-वन्यजीव संघर्ष, वणवा मुक्त वन, प्रदूषण पातळी कमी करण्यासाठी प्रयत्न, पर्यावरण संवर्धनात भूमिका आदी मुद्यांवर विद्यार्थी, शिक्षक व वन कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यात आले. वन अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत चर्चासत्रात हेमराज पाटील यांनी मध्य प्रदेश व महाराष्ट्र वन विभागाने वनक्षेत्र टिकवण्यासाठी आपसात समन्वय व सुसंवाद राखावा तसेच सातपुडा निसर्ग संवर्धन संस्थेची मदत घ्यावी असे आवाहन केले. वन अधिकारी रजनेश त्रिपाठी यांनी या मागणीला होकार दिला. सर्व उपस्थितांनी श्री हेमराज पाटील यांच्यासोबत निसर्ग रक्षण व पर्यावरण संवर्धनाची प्रतिज्ञा घेतली.
शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांनी वन भ्रमंती , पक्षिनिरीक्षण अरण्य लिपी वाचन, चर्चासत्र, मनोरंजक खेळ, प्रश्नोत्तर, सादरीकरण इत्यादीत सहभाग घेतला. आयोजकांकडून अल्पोपहार व वनभोजनाची व्यवस्था करण्यात आली. शिबिर यशस्वितेसाठी वनविभाग कर्मचारी व विद्यालयाचे शिक्षक सुनील सोनी, जाधव, ए भदोरिया, श्रीमती भदोरिया, श्रीमती एल.माली, सुश्री अंजू सुल्या, श्रीमती रामोडे, शिपाई भूषण सोनवणे आदिंनी परिश्रम घेतले.