जळगाव ः प्रतिनिधी
देशात नावलौकिक प्राप्त केलेली भोरगाव लेवा पंचायत ही लेवा पाटीदार समाजाची अग्रणी संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून अव्याहतपणे समाज हिताचे कार्य सुरू आहे. संस्थेचे कुटुंबनायक हे पद वंशपरंपरेने पाडळसा येथील पाटील घराण्याकडे असून उर्वरीत कार्यकारिणी ही समाजबांधवांना विश्वासात घेऊन गठीत केली जाते. सदर कार्यकारिणीवर कुलसचिवपदी 2016 मध्ये ॲड संजय राणे यांची नियुक्ती केली होती. मात्र त्यांच्या कामकाजाची कार्यपध्दत चुकीची असल्याची समाजबांधवांच्या लक्षात आले. ज्या पध्दतीने पारदर्शी काम व्हायला पाहिजे होते ते न होता समाजास वेठीस धरण्याचे काम होत असल्याचे ज्यावेळी सुज्ञ समाजबांधवांना दिसू लागले त्यावेळी त्यांनी सदर बाब कुटुंबनायक रमेशदादा विठू पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. कारण लेवा पंचायतीमध्ये होणाऱ्या कामकाजाबाबत संपूर्ण समाज बदनाम होऊ नये यासाठी समाजातील उच्च विद्याविभूषीत प्रतिष्ठीत समाजबांधवांनी या संदर्भात वारंवार पंचायतीकडे मौखीक तथा लेखी स्वरूपात तक्रारी केल्या. दरम्यान जागरूक समाजबांधवांच्या तक्रारीनंतर नुकत्याच झालेल्या एका पंचायतच्या बैठकीत कुटुंबनायक रमेशदादा पाटील यांनी कुलसचिव पदाची मुदत 31 डिसेंबर 2021 रोजी संपली असल्याचे सांगितल्याने तसेच संबंधि लेवा भोरगाव पंचायतच्या प्रोसिडींग बुकमध्ये निर्देशीत असल्याने भोरगाव लेवा पंचायत पाडळसे या सामाजिक संस्थेचे कुटुंबप्रमुख रमेशदादा विठू पाटील यांनी कुलसचिवपदी असलेले ॲड. संजय राणे यांचा कार्यकाळ (2016 ते 2021) हा संपलेला असल्यामुळे त्यांना पदावरून कार्यमुक्त केले आहे. यापुढील काळात ॲड राणे यांचा भोरगाव लेवा पंचायत कार्यकारिणी कामकाजासंदर्भात कोणताही संबंध राहिलेला नाही, याची समाजबांधवांनी दखल घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
गेल्या दोन महिन्यापासून लेवा समाजातील सुज्ञ समाजबांधवांनी ॲड संजय राणे यांना पदावरून हटविण्याबाबत समाजहिताचा विचार करत आग्रही भूमिका घेतली होती. या संदर्भात 850 हून अधिक समाजबंधूंनी भोरगाव लेवा पंचायतकडे लेखी निवेदन देखील दिले होते. त्यानुसार पंचायतची बैठक नुकतीच होऊन या बैठकीत ॲड. संजय राणे यांना पदमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार नवीन कार्यकारिणीची नेमणूक करण्यासाठी लेवा भोरगाव पंचायतीच्या नियमानुसार डिसेंबर 2022 पर्यंत नवीन कार्यकारिणीची नेमणूक करण्यासाठी पंचकमेटी निवडावी असेही या बैठकीत ठरले आहे. पंचायतीची नवीन कार्यकारिणी ही पुढील पाच वर्षाकरिता राहील, तसेच या कार्यकारिणीत फेरबदलाचे सर्व अधिकार कुटुंबनायक रमेशदादा विठू पाटील यांना राहतील, असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
समाजातील विविध समस्या, जटील प्रश्न सोडविण्याचे काम लेवा भोरगाव पंचायतीच्या माध्यमातून सुरू आहे. कुटुंबनायक रमेशदादा विठू पाटील हे विठू पाटील यांच्या निधनानंतर सुमारे 52 वर्षापासून समाजाची सेवा करत आहेत. लेवा भोरगाव पंचायतीबद्दल समाजात एक आदर आहे. मात्र ॲड. संजय राणे यांची कुलसचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या कार्यकाळात समाजाचे कामकाज करतांना विशेषत: विवाह संबंधांतून निर्माण झालेल्या अडचणी सोडवितांना पंचायतबद्दलची भावना कुलषित होतांना दिसून आली. ॲड. राणे यांचे वागणे त्यांनी नियमबाह्य केलेली कामे याची मालिकाच ज्येष्ठ व श्रेष्ठ तसेच समाजातील प्रतिष्ठीत नागरिकांनी कुटुंबनायक श्री. पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन बोलूनही दाखविली होती. यामुळे समाजातील पवित्र स्थान असलेली लेवा भोरगाव पंचायतीची प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत समाजबांधवांनी या बेकायदेशीर होणाऱ्या कामकाजास आळा घालण्यासाठी पुढे होत ॲड. राणे यांना पदावरून हटविण्यासाठी आग्रही मागणी केली होती.
दरम्यान ‘साईमत’ प्रतिनिधीने भोरगाव पंचायतीचे कुटुंबनायक रमेशदादा पाटील यांच्याशी संपर्क साधला असता कुलसचिवपदासह संपूर्ण कार्यकारिणीचा कार्यकाळ संपल्याने ही सर्वच कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून नवीन कार्यकारिणी गठीत करण्यासाठी डिसेंबर 2022 पर्यंत एक पंच कमेटी गठीत करण्यात येईल. व त्यानंतर नवीन कार्यकारिणी घोषित होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ॲड. संजय राणे यांना कुलसचिव पदावरून मुक्त करण्यात यावे, या मागणीसाठी ज्या समाजबांधवांकडून पुढाकार घेण्यात आला होता त्यात माजी आमदार निळकंठ फालक, उद्योजक अरुण बोरोले, माजी नगरसेवक चंद्रकांत बेंडाळे, माजी नगराध्यक्ष बंडुदादा काळे, माजी प्राचार्य एस.एस. राणे, जळगाव विठ्ठल मंदिर संस्थानचे अध्यक्ष विलास हरी चौधरी, ॲड. तुळशीराम नेमाडे, माजी उपमहापौर सुनिल खडके, डॉ. मिलिंद पाटील, माजी प्रा. अरुण पाटील, राजेंद्र मुरलीधर पाटील (पिंपळगाव), सेवानिवृत्त अधिकारी डी.एन. पाटील, भुसावळचे रघुनाथशेठ चौधरी, गिरीष नारखेडे, तुषार वाघुळदे, ॲड. प्रवीण जंगले, माजी नगरसेवक रविंद्र पाटील, ॲड. भारती ढाके, ॲड.व्ही.आर. ढाके आदींचा समावेश आहे.
लेवा भोरगाव पंचायतीचे कामकाज ठाया पाडळसे ता. यावल या मुख्य कार्यालयातच होते. तसेच पंचायतीचे विभागीय कार्यालय भुसावळ, जळगाव व मलकापूर येथे असून अन्य ठिकाणी कुठेही पंचायतीचे कामकाज होत नाही. यासंबंधी समाजबांधवांनी नोंद घ्यावी. इतरत्र कोठेही पंचायतीचे कामकाज होत नाही.
