भुसावळ : प्रतिनिधी
शहरात पालिकेच्या माध्यमातून अतिक्रमण हटाव मोहीम राबवणे सुरू आहे. शुक्रवारी खडका रोडवर चांगलाच राडा झाला. खडका रोड भागातील एम.आय.तेली बिल्डर कार्यालया समोरील गटारी वरील ढाप्याचे अतिक्रमण काढणे सुरू होते. यावेळी पालिकेचे माजी गटनेते मुन्ना तेली यांचे चिरंजीव आशिक तेली यांनी पथकाला अटकाव केला. हा वाद सोडवण्यासाठी आलेले पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिविगाळ, धक्काबुकी केली. त्यामुळे पोलिसांनी आशिकला अटक करुन शासकीय कामात अडथळा, लोकसेवकास मारहाण, धक्काबुकी, शिविगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला.
दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात पालिकेने शहर पोलिस ठाणे हद्दीत १४, तर बाजारपेठ च्या हद्दीत ५४ अशी ६८ अतिक्रमणे नष्ट केली. पालिकेने गुरुवारपासून जळगाव रोड, हंबर्डीकर चौक, जामनेर रोडवरील अतिक्रमण काढले. यानंतर शनिवारी दुसऱ्या टप्प्यात कारवाई झाली. त्यात पालिकेचे पथक दुपारी १ वाजेच्या सुमारास खडका रोड भागात अतिक्रमण काढत होते. यावेळी पालिकेचे माजी गटनेते मुन्ना तेली यांचे चिरंजीव आशिक तेली यांनी गटारी वरील ढापा तोडू नका, असे सांगत स्थापत्य अभियंता विजय तोष्णीवाल, वसंत राठोड, आरेखक महेश चौधरी यांच्याशी हुज्जत घातली. जेसीबी चालक राहुल बारी याला शिविगाळ करत अतिक्रमण काढण्यास विरोध दर्शवला. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक हरीष भोये हे समजावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, आशिकने भोये यांची कॉलर पकडून धमकावले. जळगावच्या आरसीपी क्रमांक २ मधील कर्मचारी एस.एस.तडवी हे पुढे आले. मात्र, त्यांनाही धक्काबुक्की झाली. तडवी यांची कॉलर पकडून शर्टाची दोन बटणे तोडली. या प्रकारात सहायक निरीक्षक भोये यांच्या मानेजवळ, कर्मचारी राहुल वानखेडे यांच्या उजव्या हाताला जखम झाली. यानंतर पोलिसांनी आशिकला तत्काळ अटक केली. पोलिस कर्मचारी सुनील तडवी यांच्या फिर्यादीवरून आशिक विरूद्ध शासकीय कामात अडथळा , पोलिस अधिकाऱ्यांना शिवीगाळ, इच्छा पूर्वक दुखापत व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी घटनास्थळावरून आशिक तेली याला शासकीय वाहनाने बाजारपेठ पोलिस ठाण्यात आणले. तत्पूर्वी, रजा चौक भागातील हॉटेल फिरदोस जवळ पोलिस व्हॅन थांबवली. तेथे आशिकला वाहनातून खाली उतरवून खाकीचा प्रसाद दिला. ही धुलाई करताना कोणीही छायाचित्र किंवा व्हिडीओ शुटींग करू नये, याची दक्षता घेतली. शहरातील गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी यापूर्वी कुख्यात आरोपी निखिल राजपूतला हीच ट्रिटमेंट दिली होती.
अतिक्रमण हटाव मोहिमेचे वार्तांकन करण्यासाठी गेलेले पत्रकार ज्ञानेश्वर आमले हे आशिक तेली यांना मारहाण होत असल्याचे छायाचित्र व व्हीडिओचित्रण करत होते. याचा राग आल्याने बाजारपेठेचे पोलिस निरीक्षक राहूल गायकवाड यांनी आपल्याला मारहाण केली, अशी तक्रार आमले यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली. गायकवाड यांनी मोबाइल हिसकावून कानशिलात लगावली. तोंडावर मारहाण करत खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा सोमवारपासून (दि.२८) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसू असा इशारा दिला.
पालिकेच्या १०० कर्मचाऱ्यांच्या ७ पथकांनी शनिवारी सकाळपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरु केली. गुरुवारी जामनेर रोडवरील अर्धे अतिक्रमण काढलेल्या भोळे भरीत-पुरी सेंटरचे संपूर्ण अतिक्रमण शनिवारी काढण्यात आले. यानंतर जामनेर रोड, खडका रोड, गवळी वाडा, जळगाव रोड मामाजी टॉकीज भागातील अतिक्रमणांवर हातोडा पडला. शनिवारच्या कारवाईत बाजारपेठ पोलिस ठाणे हद्दीत ५४, शहर हद्दीत १४ अतिक्रमणे काढले. पुन्हा अतिक्रमण केल्यास थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा पालिकेने दिला.