धर्मशाला ः वृत्तसंस्था
प्रामुख्याने युवा खेळाडूंभोवती संघबांधणी करण्यात आलेला भारतीय संघ शनिवारी श्रीलंकेविरुद्धच्या तीन लढतींच्या ट्वेन्टी-20 मालिकेत विजयी आघाडी घेण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. उभय संघांत धरमशाला येथे दुसरा ट्वेन्टी-20 सामना रंगणार आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्या लढतीत श्रीलंकेला 62 धावांनी धूळ चारली. आगामी ट्वेन्टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीने भारतीय संघ युवा फळीची चाचपणी करत आहे. दुसरीकडे अनेक प्रमुख खेळाडू विविध कारणास्तव संघाबाहेर गेल्यामुळे श्रीलंकेच्या चिंतेत भर पडली आहे.
विंडीजविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेत धावांसाठी झगडणाऱ्या इशान किशनने 89 धावांची खेळी साकारून भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्याशिवाय मुंबईकर श्रेयस अय्यरनेही वेगवान अर्धशतकासाह विश्वचषकाच्या दृष्टीने संघातील स्थानासाठी दावेदारी पेश केली आहे. ऋतुराज गायकवाडच्या तंदुरुस्तीबाबत अद्याप संभ्रम कायम आहे.
गोलंदाजीत पर्याय उपलब्ध
पहिल्या लढतीत जसप्रीत बुमरा आणि भुवनेश्वर कुमार या प्रमुख वेगवान गोलंदाजांनी वैयक्तिक चार षटके न टाकताही भारताने श्रीलंकेला रोखले. वेंकटेश अय्यर, यजुर्वेद्र चहल मधल्या षटकांत बळी मिळवून देत आहेत. तर हर्षल पटेल हाणामारीच्या षटकांत टिच्चून गोलंदाजी करत आहे. त्यामुळे एकूणच भारताचे गोलंदाजी विभाग सर्वोत्तम लयीत असल्याचे दिसून आले.
वेळ : सायं. 7 वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स 1, 1 हिंदी.