“भाजपाच खरी ‘टुकडे टुकडे गँग’, त्यांनी हिंदू-मुस्लिमांना धर्माच्या तर”

0
37

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । देशात कोरोना पसरवण्यास महाराष्ट्र काँग्रेस आणि दिल्लीतील ‘आप’ कारणीभूत आहेत. या पक्षांनी महाभयानक संकटातही गलिच्छ राजकारण केले, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत केली. या दोन्ही पक्षांनी त्यांच्या राज्यांमध्ये इतर राज्यांमधून आलेल्या लोकांना स्वत:च्या राज्यात परतण्यासाठी प्रोत्साहन दिल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला अशी टीका मोदींनी केली आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मोदींनी एक तासाहून अधिक वेळ केलेल्या भाषणात काँग्रेसवर टीका आणि आरोपांचा भडीमार केला. याच टीकेवरुन आता काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी भाजपावर टीका केली आहे.

थरुर यांनी पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर एका वृत्तसंस्थेशी बोलतांना राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधानांनी केलेले भाषण हे राजकीय होते अशी टीका केली. “त्यांनी (पंतप्रधान मोदींनी) त्यांच्या संपूर्ण भाषणामध्ये केवळ काँग्रेसवर टीका केली. त्यांचे हे भाषण राजकीय होते ज्यामधील बराचसा भाग हा काँग्रेसवर टीका करणारा होता. माझ्या मते आम्हाला आनंद झाला पाहिजे की, ते आम्हाला या नजरेने पाहतात,” असा टोला थरुर यांनी लगावलाय.

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणामध्ये काँग्रेसला ‘टुकडे टुकडे गँग’चे प्रमुख म्हटले. इंग्रज निघून गेले पण, तोडा आणि राज्य करा, ही त्यांची वृत्ती काँग्रेसला देऊन गेले. काँग्रेस हा ‘टुकडे टुकडे गँग’चा नेता बनला आहे, असा गंभीर आरोप मोदींनी केला. काँग्रेसची सत्तेत येण्याची इच्छा संपलेली आहे पण, विभाजनवादाची मुळे बळकट करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे.गेली 70 वर्षे काँग्रेसने विभाजनवादाचा खेळ खेळला,पण हा देश अमर होता, श्रेष्ठ होता, आहे आणि राहील, असे मोदी म्हणाले. याच टीकेवरुन उत्तर देताना थरुर यांनी, “काही वर्षांपूर्वी मी म्हणालो होतो की, भाजपा हीच खरी ‘टुकडे टुकडे गँग’ आहे.त्यांनी हिंदू-मुस्लिमांना धर्माच्या आधारे तर भाषेच्या आधारे उत्तर-दक्षिण भारत अशी दुही निर्माण केलीय. भाजपा हे विभाजन करत आहे,” असा टोला लगावलाय.

पंतप्रधान मोदींच्या आरोपांवर काँग्रेस आमदाराचे प्रत्युत्तर
महाराष्ट्र काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी ट्विट करत स्टेशनच्या बाहेर लोकांना जेवण देणे म्हणजे लोकांना घाबरवणे हे मला माहीत नव्हते, असे म्हटले आहे. “सॉरी सर, आपला जीव धोक्यात घालून स्टेशनच्या बाहेर लोकांना जेवण देणे म्हणजे निरपराध लोकांना घाबरवणे हे मला माहीत नव्हते!”; असे झिशान सिद्दीकी यांनी म्हटले आहे. दरम्यान, केंद्र सरकारने अचानक लागू केलेल्या टाळेबंदीमुळे लाखो मजूर व गोरगरिबांचे हाल झाले. त्यांच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडी सरकारने केली होती. अडकून पडलेल्या 50 हजार मजुरांना काँग्रेस पक्षाने स्वखर्चाने आपापल्या गावी परत पाठविले होते. केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्यानेच आम्ही मदत केली व त्याचा आम्हाला अभिमान आहे, असे प्रत्युत्तर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here