मुंबई : प्रतिनिधी
येत्या २० जून रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपल्या दोन उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी झहीर झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देत पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे आभार मानत भाजपकडून माजी मंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी न दिल्यावरून खंतही व्यक्त केली.
माझे नाव विधान परिषदेसाठी जाहीर केले यासाठी मी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे मी मनापासून आभार मानतो. मागील ४० वर्षे भाजपामध्ये निष्ठेने काम करत होतो. पण अनेकदा त्याठिकाणी माझ्यावर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली. भाजपात असताना विधान परिषदेसाठी नाव देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. अनेक प्रसंग असे घडत गेले की त्यामुळे मला नाईलाजाने भाजपाचा त्याग करुन राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करावा लागला. शरद पवार यांच्या नेतृत्वावर मी विश्वास ठेवला आणि त्यांनी आज माझ्यावर विश्वास टाकला. तो विश्वास मी सार्थ करेन. आमच्या जळगाव भागामध्ये भाजपा वाढण्यासाठी उभे आयुष्य खर्ची घातले. मात्र आता राष्ट्रवादी पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी काम करेन, अशी ग्वाही एकनाथ खडसे यांनी दिली.
मी माझ्या राजकीय जीवनामध्ये मी अनेक चढ उतार बघितले आहेत. माझ्यासाठी सत्ता महत्त्वाची नाही कारण बरीच वर्षे मी मंत्रीपदावर विरोधी पक्षनेतेपद उपभोगले आहे. त्यामळे आमदारकीचे कौतुक आहे असे नाही. पण भाजपाने ज्या परिस्थितीत मला बाजूला केले आणि राष्ट्रवादीने मला आधार दिला हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. निवडून आल्यानंतर ज्यांनी माझे राजकीय पुर्नवसन केले त्यांच्याशी प्रामाणिक राहण्याची भूमिका मला पार पाडावी लागेल. अनेक जण म्हणत होते की, एकनाथ खडसे आता इतिहासात जमा झाले. अशी शक्यता असताना राष्ट्रवादीने माझ्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. अडचणींच्या वेळेस हात देणे महत्त्वाचे असते. त्यामुळे मी कायम यांचा ऋणी राहणार आहे, असेही खडसे म्हणाले.
यावेळी बोलताना त्यांनी भाजपकडून पंकजा मुंडेंना उमेदवारी न देण्यावरूनही खंत व्यक्त केली. हा पक्षांतर्गत निर्णय असला तरी मुंडे-फुंडकर-खडसे यांनी भाजपाला बहुजन समाजाचा चेहरा म्हणून देण्याचा प्रयत्न केला. गोपीनाथ मुंडे यांनी भाजपाचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न केला. अशा स्थितीमध्ये कोणीही नवखे आले की त्यांच्यासाठी पक्ष उमेदवारी देतो. पंकजा मुंडे यांना उमेदवारी न देणे हे अत्यंत दुर्देवी आहे. खेदजनक आहे. पंकजा मुंडेंवर हा मोठा अन्याय आहे. ज्यांनी पक्षासाठी काहीच केले नाही, ते अचानक येतात आणि त्यांना पदावर बसवले जातात. शेवटी तो त्या पक्षाचा निर्णय आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले.
