जळगाव ः प्रतिनिधी
भगवान परशुराम जयंती यंदा बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे जल्लोषात साजरी केली जाणार आहे. त्यामुळे यंदा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात 1 मे रोजी भव्य दुचाकी रॅली तर 3 मे रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास शहरातील रथ चौकातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
ब्राह्मण समाजातील जवळपास 50 शाखा व भाषा असलेले समाजबांधव यादिवशी एकाच ठिकाणी येऊन उत्सव साजरा करणार आहेत. कार्यक्रमासाठी सुमारे 50 कार्य समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. त्यात 400 स्वयंसेवकांचा समावेश आहे. ढोल पथकाचा सराव जी. एस. मैदान या ठिकाणी सुरु आहे. 1 मे रेाजी संध्याकाळी 5 वाजता संभाजी चौकापासून दुचाकी रॅलीची सुरवात होईल. बालगंधर्व खुले नाट्यगृह या ठिकाणी समारोप होईल. पारंपारीक वेशभूषेत महिला व युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असेल.
3 मे रोजी शोभायात्रा रथचौक राम मंदिर येथून काढण्यात येणार असून बालगंधर्व नाट्यगृह येथे शोभायात्रेचा समारोप होईल. कार्यक्रमास अध्यक्ष अजित नांदेडकर, महिला अध्यक्षा मनिषा दायमा, नियोजन समिती प्रमुख श्रीकांत खटोड, लेखराज उपाध्याय, सुरेंद्रनाथ मिश्रा, सुधा खटोड आदींचे मार्गदर्शन लाभत आहे.