जळगाव, प्रतिनिधी । जळगाव शहर महानगरपालिकेच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत आदित्य ढवळे-पाटील सेवाभावी बहुउद्देशीय संस्था शहरी बेघर निवारा केंद्रातील आठ लाभार्थ्यांवर रोटरी क्लब ऑफ जळगावतर्फे नुकतीच मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली.
आज मंगळवार, दि. ४ जानेवारी २०२२ रोजी दुपारी महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका जयश्री महाजन यांनी या केंद्राला भेट देऊन संबंधित मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या लाभार्थ्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून प्रकृतीची विचारपूस केली. महापालिका उपायुक्त श्याम गोसावी, गायत्री पाटील, रोटरी क्लब ऑफ जळगावचे मनोज जोशी, सचिव संदीप शर्मा, अध्यक्ष योगेश गांधी, डॉ. तुषार फिरके, शहर बेघर निवारा केंद्राचे व्यवस्थापक मनोज कुलकर्णी, मनोज मराठे आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका जयश्री महाजन यांच्या हस्ते डॉ. तुषार फिरके व रोटरी क्लब ऑफ जळगावच्या पदाधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.