जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील हिंगणा येथील एक तरूण बनावट नोटांची छपाई करत असल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी पहूर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील हिंगणे येथील रहिवासी असणारा उमेश चुडामण राजपूत (वय २२) हा काल रात्रीच्या सुमारास पहूर बस स्थानक परिसरात संशयास्पद पध्दतीत फिरत होता. यामुळे पोलिसांनी त्यांची विचारपूस करून झडती घेतली. यात त्याच्याकडे दोनशे रूपयाची एक बनावट नोट आढळून आली. यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.
या चौकशीत उमेश राजपूत याने आपण दोनशेच्या बनावट नोटांची आपल्या घरीच छपाई करत असल्याची माहिती दिली. यानुसार पोलिसांनी त्याच्या घरी रात्री छापा टाकून बनावट नोटा प्रिंट करण्याची सामग्री जप्त केली. यात दोनशेच्या २३ बनावट नोटा आणि प्रिंटर व शाई आदी सामग्रीचा समावेश होता. या प्रकरणी पहूर पोलीस स्थानकात रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.