बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बोदवड येथे स्थलांतराला विरोध

0
26

बोदवड :प्रतिनिधी 
तालुक्यातील शेलवड येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे बोदवड शाखेत विलीनीकरण होणार आहे. हे विलीनीकरण ३० एप्रिलपर्यंत रद्द करून शेलवड शाखा कायमस्वरूपी ठेवावी, असे निवेदन शेलवड ग्रामस्थांनी २७ एप्रिलला जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. मागणी मान्य न झाल्यास २ मे पासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र, त्यानुसार प्रतिसाद न मिळाल्याने ग्रामस्थांनी सोमवारपासून उपोषण सुरू केले होते.

शेलवड हे तालुक्यातील १० हजार लोकसंख्येचे गाव आहे. त्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेचे बोदवड येथील शाखेत विलीनीकरण झाले तर गाव व परिसरातील वृद्ध, निराधार, दिव्यांग खातेदारांची गैरसोय होईल. त्यामुळे हे विलीनीकरण थांबवावे या मागणीसाठी शेलवड ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून साकडे घातले होते. त्यात शेलवड शाखेला परिसरातील जलचक्र बुद्रूक, जलचक्र खुर्द, पळासखेडे, वराड बुद्रूक, वराड खुर्द, मुक्तळ, वाकी, बोरगाव, सुरवाडे बुद्रूक, सुरवाडे खुर्द मानमोडी ही गावे जोडली आहेत. शाखेचे स्थलांतर झाल्यास या गावातील ग्राहकांची गैरसोय होईल, कारण दिले होते. पण उपयोग न झाल्याने ग्रामस्थांनी सोमवारपासून शेलवड येथील बँकेच्या शाखेसमोर उपोषण सुरू केले. ते उशिरापर्यंत कायम होते.

ग्रामस्थांच्या या आंदोलनाची माहिती मिळताच जळगाव येथून झोनल अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट दिली. ग्रामस्थांची मागणी वरिष्ठांना कळवू असे सांगितले. यावेळी सरपंच समाधान बोदडे, उपसरपंच रामदास इंगळे, ग्रा.पं.सदस्य दीपक माळी, पोलिस पाटील प्रदीप सुकाळे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here