राज्यसभेचा निकालानंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीतही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा चमत्कार दिसून पडेल. भाजपचे पाचही उमेदवार निवडून येईल, असा विश्वास भाजपचे नेते आणि आमदार परिणय फुके यांनी व्यक्त केला आहे. अपक्ष आणि इतर पक्षांचे आमदार भाजपच्या (BJP) संपर्कात असल्याचा दावाही त्यांनी केला. राज्यसभेच्या निवडणुकीत गुप्त मतदानाची प्रक्रिया नव्हती. तरीही आमचे तिन्ही उमेदवार निवडून आले. आता तर विधान परिषद निवडणुकीत गुप्त पद्धतीने मतदान होणार आहे, असे सूचक विधान त्यांनी केलं.
अपक्ष आणि इतर पक्षांचे आमदार तीन दिवसांपासून भाजपच्या संपर्कात आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी होतील, असे अनेकांना वाटत नव्हतं. मात्र चमत्कार घडला. आता २० जूनला विधान परिषदेतच्या निवडणुकीत आणखी एक चमत्कार बघायला मिळेल. देवेंद्र फडणवीस पुन्हा चमत्कार दाखवतील, असा विश्वास फुकेंनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल (Uddhav Thackeray) आमदारांच्या मनात मोठी नाराजी आहे. २० तारखेला होणाऱ्या निवडणुकीत हीच नाराजी उघड होईल. विधान परिषदेच्या निवडणुकीत गुप्त मतदान पद्धत वापरली जाणार आहे. त्यामुळे अनेक नाराज आमदार भाजप उमेदवारांच्या बाजूने मतदान करतील, असा दावा फुकेंनी केला. सध्या भाजपच्या आमदारांचा मुक्काम पंचतारांकित हॉटेलमध्ये असून इतर अपक्ष आमदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी भाजप नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. पाच उमेदवार निवडून आणणं कठीण काम आहे. पण नाराज आमदार आणि अपक्षांच्या मदतीने पाच उमेदवार निवडून येतील, असे फुके म्हणाले.