जळगाव : प्रतिनिधी
प्रेम विवाह केल्याच्या रागातून पत्नीच्या नातेवाईकांनी पतीसह त्याच्या नातेवाईंकांना मारहाण करून जखमी केले तर रिक्षाची तोडफोड करून नुकसान केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भावेश रमेश गोसावी (वय-२२) रा. लक्ष्मीनगर जळगाव हा आपल्या पत्नी जागृती व कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. भावेशने जागृतीशी प्रेमविवाह केला आहे. त्यामुळे जागृतीचे नातेवाईक यांच्या मनात राग होता.
दरम्यान १५ मे रोजी सकाळी ७ वाजता भावेश हा पत्नी व नातेवाईकांसोबत रिक्षाने विशाल पेट्रोल पंपाजवळील गुलाबाबा कॉलनी रोडवरील नर्सरी समोरून जात असतांना गजेंद्र घुगे-पाटील, निलेश राजेंद्र घुगे, दुर्गेश गजेंद्र घुगे, निखील राजेंद्र घुगे, तुषार राजेंद्र घुगे आणि जितेंद्र घुगे-पाटील यांच्यासह इतर २ ते ३ जण सर्व रा. लक्ष्मीनगर जळगाव यांनी रिक्षा आडवून भावेशसह त्याची आईव व नातेवाईकांना बेदम मारहाण करून जखमी केले. तर रिक्षाची तोडफोड करून नुकसान केले. त्यानंतर भावेशची पत्नी जागृती हिला बळजबरी घेवून गेले.
दरम्यान, याप्रकरण भावश गोसावी याने एमआयडीसी पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नितीन पाटील करीत आहे.