केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात देशात शेतकऱ्यांचे आंदोलन आता अधिक उग्र स्वरुप धारण करत आहे. या दरम्यान पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी या कायद्यांच्या निषेधार्थ आपला पद्मविभूषण हा सन्मान परत केला आहे.
नवी दिल्ली: केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात देशात शेतकऱ्यांचे आंदोलन आता अधिक उग्र स्वरुप धारण करत आहे. या दरम्यान पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी या कायद्यांच्या निषेधार्थ आपला पद्मविभूषण हा सन्मान परत केला आहे. बादल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना तीनपानी पत्र लिहून केंद्रीय कृषी कायद्यांचा निषेध केला आणि शेतकऱ्यांवर करण्यात येत असलेल्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त करत पद्मविभूषण परत केला
आपला पद्मविभूषण सन्मान परत करताना पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल म्हणाले, ‘मी इतका गरीब आहे की, शेतकऱ्यांसाठी अर्पण करण्याला माझ्याकडे काहीच नाही. मी जो काही आहे तो शेतकऱ्यांमुळेच आहे. अशात जर शेतकऱ्यांचा अपमान होत असेल, तर कोणत्याही प्रकारचा सन्मान राखून ठेवण्यात काहीच फायदा नाही.’
शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली असून, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे दु:ख झाले आहे. शेतकऱ्यांच्या आदोलनाला ज्या प्रकारे चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात येत आहे ते अतिशय दु:खद असल्याचे बादल यांनी म्हटले आहे.