पो.नि. संतोष भंडारेंच्या चौकशीसाठी सराफ असोसिएशनकडून पुरावे सादर

0
19

जळगाव ः प्रतिनिधी

सराफाच्या दहा लाखांपैकी दीड लाख रुपये काढून घेतल्यानंतर परत केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तत्कालीन पोलिस निरीक्षक संतोष भंडारे यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी करण्यात आली. दरम्यान, हा गंभीर प्रकार असून या संदर्भात संपूर्ण चौकशी करण्यासाठी सराफ असोसिएशनने सर्व पुरावे पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. चौकशीत दोषी आढळून आल्यास भंडारेंवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आठ दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील गेवराई येथील एक सराफ व्यावसायिकाने व्यवहाराचे 10 लाख रुपये जळगावात पाठवले होते. हे पैसे जळगावात पोहोचल्यानंतर संबंधित व्यक्तीने जळगावच्या दोन जणांना मदतीसाठी बोलावले. रात्रीच्या वेळी ही रक्कम दुचाकीवरुन तिघे जण घेऊन जात असताना जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांची दुचाकी अडवली. बॅग तपासली असता त्यात रक्कम आढळून आली. ही रक्कम चोरीची असल्याच्या संशयावरुन पोलिस ठाण्यापर्यंत विषय गेला. सर्व चौकशी झाल्यानंतर पैसे अधिकृत असल्याचे निष्पन्न झाले. यानंतरही पोलिस निरीक्षक भंडारे यांनी त्यातील दीड लाख रुपये काढून घेत संबधितांना साडेआठ लाख रुपये परत केले.

या प्रकरणी दुसऱ्या दिवशी सराफ असोसिएशनने पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याकडे तक्रार केली. यात भंडारे दोषी आढळून आले. त्यांनी नंतर दीड लाख रुपये परत केले. या कारणामुळे भंडारे यांची उचलबांगडी करुन त्यांना नियंत्रण कक्षात जमा केले. त्यांच्या जागेवर अरुण धनवडे यांना नियुक्ती देण्यात आली. दरम्यान, या प्रकरणात आता सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांच्याकडे चौकशी सोपवण्यात आली आहे. या चौकशीचा अहवाल ते डॉ. मुंढे यांना देतील. यात भंडारे दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

तथ्यानुसार कारवाई करणार : डॉ. मुंढे
चौकशी व्यवस्थित व्हावी यासाठी सराफ असोसिएशनने सर्व पुरावे पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणात निर्दोष चौकशी व्हावी, दोषी असलेल्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सराफ असोसिएशनने केली आहे. अशी माहिती असोसिएशनचे अजय ललवाणी यांनी दिली. तर चौकशी अहवाल आल्यानंतर त्यात असलेल्या तथ्यानुसार कारवाई करणार असल्याचे डॉ. मुंढे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here