जळगाव ः प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनातर्फे खान्देशातील पहिल्या वही गायन महोत्सवाचे 4 ते 6 मार्च दरम्यान सायंकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत महात्मा गांधी उद्यानात आयोजन करण्यात आले आहे.
यात तीन दिवस लोककलेचा जागर होणार असून महोत्सवाच्या समन्वयकपदी लोककलावंत विनोद ढगे यांची निवड करण्यात आली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या संकल्पनेतून व पालकमंत्री मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने या महोत्सवाचे आयोजन आले आहे. खान्देशातील लोककलावंताना शासनस्तरावर आपली कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, खान्देशातील पारंपारीक लोककलेच्या सन्मान व्हावा या लोककलेत कार्यरत कार्य करणाऱ्या लोककलावंताचा यथोचित गौरव व्हावा, या उद्देशाने शासनातर्फे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवात खान्देशातील 9 वही गायन मंडळे सहभागी होतील. तीन दिवस हा महोत्सव रंगणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
महोत्सवाचे आयोजन व नियोजनासाठी खान्देशातील लोककलेचे अभ्यासक, कलावंत विनोद ढगे यांची समन्वयक म्हणून शासनाने निवड केली आहे. ग्रामीण भागातील लोककलावंताचा कला अविष्कार पहाण्यासाठी नागरिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय व संचालक बिभीषण चौरे यांनी कळवले आहे.