जळगाव : प्रतिनिधी
प्रायोगिक रंगभूमी ही आजच्या काळात सशक्त करण्यासाठी जळगावची परिवर्तन संस्था करतेय. परिवर्तनची नाट्य निर्मिती ही सशक्त व नावीन्यपूर्ण असून मराठी रंगभूमी समृद्ध व सशक्त बनतेय.असे मत अभिनेते ओकांर गोवर्धन यांनी पुणे येथे आयोजित परिवर्तन कला महोत्सवाच्या समारोप समारंभात व्यक्त केले.
नाटकघर व अतुल पेठे आयोजित तीन दिवसीय कला महोत्सवाचा समारोप काल संत कबिरांचा संगीतमय पद्धतीने शोध घेणार्या …हंस अकेला… ने करण्यात आला. या समारोप प्रसंगी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, लेखिका गीतांजली वि. म. , अनिल पाटकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमात कबिराचा शोध परिवर्तनच्या कलावंतांनी उत्तमपणे घेतला. …मन लागो यार फकिरी मे…हे गीत सुफी गायकी, वेस्टर्न, क्लासिकल, कव्वाली, पारंपरिक कबीर गायकी याप्रकारात गायन करून सुरवात करून श्रद्धा कुलकर्णी, अनुषा महाजन,अक्षय गजभिये यांनी वेगवेगळ्या संगीत लयाचा वापर करून मैफल जिंकून घेतली. विशाल कुलकर्णी यांनी पारंपरिक पद्धतीची कबिराची गायकी तर शास्त्रीय संगीतातल्या बंदिशींनी कबिराचे दोहे अक्षय गजभिये यांनी सादर केले.बंगाली बाऊलचा गोडवा साक्षी पाटील हिने उभा केला. खड्या स्वरात प्रतिक्षा कल्पराज हिने ’ कोई नही अपना म्हणत’ आर्त स्वर लावला. ’माटी कहे कुंभार से’ यातील दार्शनिक तत्व हर्षदा कोल्हटकर यांनी उलगडून दाखवले तर ब्रज भाषा व खडी बोलीतले दोहे नारायण बाविस्कर, विनोद पाटील यांनी सादर केले. बासरीवरची साथसंगत योगेश पाटील यांची होती तर ढोलकी, तबला, झेंबे या तालवाद्यींची बाजू मनिष गुरव यांनी सांभाळली. संत कबिराचे दोहे, साखी, रमनयनी अशा सर्व लिखित प्रकारातील तत्वज्ञान, त्यातील अध्यात्म, कबिराचा विद्रोह, साक्षीभाव अशा अनेक अंगानी कबिराचा शोध घेणारा फक्त कबीर उलगडून दाखवणारा नव्हता तर समृद्ध करणारा होता.
‘हंस अकेला’चे निवेदन शंभू पाटील यांनी प्रभावीपणे करत कबीर उलगडून दाखवला.दोहे ऐकून रसिक मंत्रमुग्ध झाले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रतिक्षा कल्पराजने केले.पुणे येथील जोत्स्ना भोळे सभागृह रसिकांनी तुडुंब भरलेले होते. या हंस अकेलाने महोत्सवाचा समारोप झाला.