मुबंई : प्रतिनिधी
उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं असून पंजाबमध्ये ‘आप’नं बाजी मारली आहे. भाजपच्या या विजयावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांनी सावधपणे भाष्य केलंय. पराभव पचवणं सोपं असतं, असं म्हणत राऊतांनी भाजपला रोखण्यात कमी पडल्याचंही मान्य केलंय. तर याचवेळी त्यांनी भाजपला टोलाही लगावलाय. राऊत यावेळी म्हणाले, त्यांनी ज्या प्रकारच्या नोटा वापरल्यात त्यापेक्षा कमी मत मिळाले आहे. विजय पचवायला शिकलं पाहिजे अजीर्ण झालं की त्रास होतो. सुडाने कारभार न करता लोकशाही पद्धतीनं राज्य करायला शिकलं पाहिजे, असं राऊत म्हणालेत. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निकालाचे कल हाती आले असून, भाजप तब्बल दोनशे पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. तर दुसरीकडे गोवा, मणिपूर, उत्तराखंडमध्येही भाजपची आघाडी आहे. भाजपच्या या विजयावर प्रतिक्रिया देताना राऊतांनी काँग्रेसचेही कान टोचले आहे.
राऊतांकडून भाजपला टोला
उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत विरोधकांना एकत्र आणून भाजपला रोखण्याचा शिवसेनेनं आणि पर्यायानं महाविकास आघाडीनं प्रयत्न केला होता. पण, तो प्रयत्न फासल्याचं दिसून आलं. भाजपविरोधात मोट बांधण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत आघाडीवर होते. आता जेव्हा पत्रकारांनी भाजपच्या विजयावर प्रतिक्रिया मागीतली तेव्हा राऊतांनी पराभव मान्य केला. उत्तर प्रदेशात चांगल्या प्रकारे विरोधकांना एकत्र आणता आलं नाही, असं राऊतांनी म्हणत भाजपचं अभिनंदन केलं. याचवेळी त्यांनी भाजपला टोलाही लगावलाय. त्यांनी ज्या प्रकारच्या नोटा वापरल्या त्यापेक्षा आम्ही कमी पडलो. हे खरंय, कारण, आमच्याकडे नोटा कमी होत्या. आम्ही लढलो, ही लढाई चालू राहील. विजय पराजय अंतिम नसतो. शिवसेनेच्या बाबतीत ही सुरुवात आहे. भविष्यात न थांबता आम्ही काम करत राहू, असा विश्वासही राऊतांनी यावेळी व्यक्त केलाय. दरम्यान, ‘आप’च्या विजयाचे संजय राऊतांनी अभिनंदनही केले. तर पंजाबमध्ये ऐतिहासिक विजय असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिलीय.
राऊतांनी टोचले काँग्रेसचे कान
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत 4 राज्यात भाजप मोठा पक्ष आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊतांनी प्रतिक्रिया देत काँग्रेसलाही काही गोष्टी सुचवल्या आहेत. राऊतांनी म्हटलंय की, काँग्रेसला धोरणात जरा बदल करावा लागेल. काँग्रेसला भूमिकेतही बदल करावा लागेल. जे निकाल आलेत जिथे फायदा घेता आला असता तो का घेता आला नाही, असा सवालही राऊतांनी यावेळी उपस्थित केलाय. तर निकाल स्वीकारयचा आणि पुढे जायचं, असं म्हणत राऊतांनी सावध भूमिका घेतली.