जळगाव : प्रतिनिधी
परिवर्तनच्या साहित्य अभिवाचन महोत्सवात डॉ. चंद्रशेखर फणसळकर लिखित ‘परवा आमचा पोपट वारला’ या कथेच्या अभिवाचनाचा प्रयोग रंगकर्मी अतुल पेठे यांनी सादर केला. एका छोट्याशा गोष्टीतून निर्माण होणारे विनोद व त्याला सशक्त अभिवाचनाची जोड मिळाली तर निर्मिती प्रभावी होऊ शकते याचा अनुभव रसिकांना आला.
अभिवाचनाचा बुधवारचा प्रयोग खान्देशातील प्रसिद्ध लेखक, कवी प्राचार्य किसन पाटील यांच्या साहित्यातील योगदान व कार्याला समर्पित केला होता. अतुल पेठे यांचं दिग्दर्शक म्हणून नाट्यक्षेत्रात सर्वांना परिचित आहे; पण त्यांनी अभिवाचन इतक्या सहजपणे व उत्कटपणे सादर केले. अभिवाचनाचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून या अभिवाचनाकडे पहाता येऊ शकतं, या कथेचा गाभा अत्यंत संवेदनशील होता. प्रयोग सुरू झाल्यापासून शेवट पर्यंत सगळ्यांना असे नाजूक चिमटे आणि गुदगुल्या होतात की प्रेक्षकांची हसून हसून पुरेवाट होते. पुण्यात राहणार्या एका मध्यमवर्गी गृहस्थाचा अठरा वर्षे पाळलेला पोपट मरतो. खरंतर एवढीच एका ओळीची ही कथा आहे; पण लेखकाने ती उत्तम फुलवलीय. आणि अतुल पेठे यांनी ती सादरीकरणात उंचीवर नेलीय. सामान्य माणसाला आजकाल जगणं हेच कठीण झालंय. एकीकडे प्रतिगामी ओढणारं आध्यात्म दुसरीकडे झपाट्याने खेचणारं प्रगत विज्ञान. या दोन्हीच्या टोकांवरच्या तेजाने सामान्य माणूस दिपून जातो. या दोन्हींची एक प्रकारची नशा येते. या गुंगीत बेसिक प्रश्नांना बगल दिली जाते. पोपटाची शिट्टीवरील गाणी जी पेठ यांनी स्वतः अभिवाचक म्हणून तयार केली आहे याची गंमत फारच मस्त होती. गणपुले, पोपट, दास्ताने गुरूजी आणि प्रो. फरासखाने असे चार पात्र व इतर नमुनेदार लोकंही आहे. हे सगळे पात्रबदल इतके सलग, सतत आणि झपाझप होतात की मी तरी जादूचा प्रयोग बघावा तस अभिवाचन होत. परिवर्तन महोत्सवामुळे रसिकांना हा सुंदर अनुभव घेता आला. महोत्सवासाठी तांत्रिक सहाय्य अविरत पाटील यांनी केले.
कालच्या अभिवाचनाने परिवर्तन अभिवाचन महोत्सवाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमास परिवर्तनचे नारायण बाविस्कर, मंजूषा भिडे, महोत्सव प्रमुख विनोद पाटील, प्रा. मनोज पाटील, होरिलसिंग राजपूत, मंगेश कुलकर्णी, प्रतिक्षा कल्पराज, मोना निंबाळकर, राहुल निंबाळकर, सुनील बारी, किशोर पवार, वसंत गायकवाड यांचे सहकार्य लाभले.