पुणे : प्रतिनिधी
काही वेळेपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत देहूच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळा पार पडला. पण, यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना भाषणच करू न दिल्यावरून खुद्द पंतप्रधान मोदींनाच याचे आश्चर्य वाटले. दरम्यान घडलेल्या या प्रकारावरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून, पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहूतील कार्यक्रमात मोदींशेजारी बसलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण केलं नाही. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडूनच अजितदादांच्या भाषणाला परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. पंतप्रधानांच्या कार्यक्रमात अजितदादांना भाषण करू न देणे हा महाराष्ट्राचा आणि पुणे जिल्ह्याचा अपमान आहे. अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे भाषण करण्याचा त्यांचा अधिकार आहे. त्यानुसार अजित पवारांच्या कार्यालयातून याबाबत पंतप्रधान कार्यलयाकडे भाषणाबाबत कळवण्यात आले होते. पण पंतप्रधान कार्यलयामधून त्यांच्या भाषणाला परवानगी देण्यात आली नाही. मी दादांच्या कार्यालयातूनही ही माहिती जाणून घेतली. हे अतिशय गंभीर आणि वेदनादायी आहे. प्रोटोकॉलनुसार अजितदादांनी पुण्याच्या विमानतळावर पंतप्रधानांचे स्वागत केले. मात्र कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाला परवानगी देण्यात आली. पण हा पंतप्रधान कार्यालयाचा अधिकार आहे. पण उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांनाही भाषणाची परवानगी द्यायला हवी होती, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दरम्यान, कार्यक्रमात सुरूवातीला देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. त्यांच्या भाषणानंतर अजित पवारांचे भाषण होईल, असे वाटत होते. ते राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून या कार्यक्रमाला आले होते. त्यामुळे त्यांचे भाषण अपेक्षित होते. पण फडणवीसांचे भाषण झाल्यानंतर निवेदकाने थेट पंतप्रधान मोदींचे नाव घेतले. यावेळी मोदींनीही निवेदकाकडे पाहत अजितदादांच्या दिशेने हाताचा इशारा करत अजित पवारांचे भाषण का नाही, असे म्हटल्याचे व्हिडीओमध्ये वाटत आहे.