मनपाच्या नेरीनाका स्मशानभूमी येथे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अत्याधुनिक शवदाहिनीचे काम पूर्ण झाले असून, लवकरच पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. शवदाहिनी कार्यान्वित होण्यामुळे प्रदूषण नियंत्रणासोबत पर्यावरणाचा होणारा र्हासदेखील थांबणार आहे. केशवस्मृती प्रतिष्ठानचा पुढाकार व देणगीदारांच्या सहकार्याने हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार असल्याचे अध्यक्ष भरत अमळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पावसाळ्यात अंत्यसंस्काराला अनेकदा ओल्या लाकडांचा प्रश्न निर्माण होतो. नेरीनाका स्मशानभूमीत दररोज ८ ते १० मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात.त्यासाठी मोठ्या प्रमाणात लाकडांचा वापर होत असतो परंतु रिखबराज बाफना आणि दिलीप चोपडा यांनी शवदाहिनी उभारणीसाठी आर्थिक सहकार्य केल्यामुळे आता नेरीनाका येथे एलपीजी गॅसवर शवदाहिनी कार्यान्वित होणार आहे. शवदाहिनीमध्ये दररोज आठ मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात येतील.यामुळे अंत्यसंस्कारावर होणारा मोठा खर्च वाचणार असून, केवळ १५०० रुपये सेवाशुल्क आकारले जाणार असल्याचे प्रकल्प प्रमुख नंदू अडवाणी यांनी सांगितले.
या वेळी जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष प्रा. अनिल राव, केशवस्मृती प्रतिष्ठानचे सचिव रत्नाकर पाटील, राजेश दोशी, विनोद जैन, समन्वयक सागर येवले उपस्थित होते.
स्वयंसहायता गटाची केली निर्मिती
केशवस्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून गॅस दाहिनीचे संचलन योग्यरितीने व्हावे यासाठी स्वतंत्र स्वयंसहायता गट स्थापन केला आहे. या गटाच्या माध्यमातून शवदाहिनीचे संचालन व व्यवस्थापन केले जाणार आहे. या गटाचे प्रमुख नंदू अडवाणी, उपाध्यक्ष राजेश दोशी, सचिव धुडकू महाले, सदस्य अविनाश जावळे, संजय नारखेडे, नीलेश झवर आदी देखरेख करणार आहेत. या शवदाहिनीसाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त केला जाणार आहे.
दोन तासातच उपलब्ध होणार अस्थी
मृतावर अंत्यसंस्कार होऊन २ तासातच अस्थी उपलब्ध होणार आहेत.ज्यांना तिसर्या दिवशी अस्थी घेऊन जायच्या असतील त्यांच्यासाठी लॉकरची व्यवस्था केली जाईल. एका अंत्यसंस्कारासाठी एक एलपीजी गॅस सिलिंडर लागणार आहे. यामुळे प्रदूषण थांबणार असून, धूर निघण्यासाठी ८० फुटांवर चिमणी उभारली आहे. गॅसदाहिनी व परिसरातील सुशोभिकरणावर ५० लाखांचा खर्च झाला असून, त्यासाठी देणगीदारांनी मदत केल्याचे नंदू अडवाणी यांनी सांगितले.