नातेवाईकांअभावी कोरोनाबाधित हिंदू तरुणावर मुस्लिम बांधवांनी केले अंत्यसंस्कार

0
28

फैजपूर ः प्रतिनिधी
मयत झालेल्या हिंदू कोरोना रुग्णाचे लांबवर असलेले नातेवाईक वेळेवर पोहचू शकत नसल्याने फैजपूर शहरातील मुस्लिम तरुणांनी मयत व्यक्तीचे पार्थिव न्हावी ग्रामीण रुग्णालयातून हलविण्यापासून तर स्मशानभूमीत पोहचवत अंत्यविधीसाठी सहकार्य करून माणुसकीचे एक अनोखे दर्शन घडविले.
यावेळी रुग्णालयात केवळ मयताची पत्नी, शालक उपस्थित होते. या शालकाने अग्निडाग देवून सोपस्कार पूर्ण केले. भालोद, (ता.यावल) येथील ६० वर्षीय इसमाला कोरोनाची लागण झाली होती. त्याला अत्यवस्थ स्थितीत बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास न्हावी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांची डॉ. अभिजित सरोदे यांनी तपासणी करून मृत झाल्याचे त्यांनी घोषित केले. दरम्यान, मृत व्यक्ती सोबत यावेळी केवळ त्याची पत्नी उपस्थित होती. तर अन्य नातेवाईक हे दूरवर राहत असल्याने ते अंत्यसंस्कारासाठी वेळेवर पोहचू शकत नव्हते. त्यामुळे अंत्यविधीचे सोपस्कार रुग्णालयामार्फत करावे अथवा अन्य पद्धतीने करावे, असा पेच निर्माण झाला होता. फैजपूरचे नगरसेवक शेख कुर्बान शेख करीम यांना ही माहिती मिळाली. त्यांनी तातडीने त्यांच्या सोबत चार मुस्लिम तरुण व पालिकेचे सफाई कामगार अशा सर्वांना सोबत घेऊन न्हावी ग्रामिण रुग्णालयात धाव घेतली. यात मुस्लिम तरुण अशपाक कुरेशी, जुबेर बेग, शरीफ खान, उमर खान, पालिका कर्मचारी मयूर चिरावंडे, अनिल अटवाल सर्वांनी पीपीई किट परिधान करीत मयत व्यक्तीला न्हावी ग्रामीण रुग्णालयातून न्हावी येथील स्मशान भूमीपर्यंत नेण्यासाठी सहकार्य केले. त्यानंतर अंत्यविधीच्या सोपस्कारसाठी हातभार लावला. यावेळी मयताचे शालक यांनी अग्निडाग दिला.
यावेळी फैजपूरचे नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, नगरसेवक केतन किरंगे, न्हावीचे पोलीस पाटील संजय चौधरी, संजय वाघुळदे यांचीही उपस्थित होती. हिंदू व्यक्तीच्या अंत्यसंस्कारला मुस्लिम तरुणांनी केलेले सहकार्य माणुसकीचे दर्शन घडविणारे ठरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here