नळगंगेचा गुदमरलायं श्‍वास

0
29

मलकापूर : प्रतिनिधी
चुकीच्या धोरणांमुळे नळगंगा नदीला गटार गंगेचं स्वरूप प्राप्त झाले. दुष्काळी परिस्थितीत खोलीकरण करण्यात आल्याने जलस्त्रोतात वाढ झाल्याची शेखीही मिरवण्यात आली. दरम्यान जलस्त्रोतांच्या भविष्यातील भवितव्याबाबतचा दूरदृष्टीकोन मात्र बाळगण्यात आला नाही. त्यामुळे गावगाड्यातील सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे नदी मरणासन्न अवस्थेत असून शेवटच्या घटका मोजू लागली आहे. तरीही नगर पालिकेने सांडपाण्यावर उपाय योजना करण्याऐवजी जलपर्णी काढण्याच्या कामावर लाखो रुपये खर्च करून केवळ ठेकेदारांना पोसण्यातच धन्यता मानली. या घोडचुकीमुळेच आज मितीस नळगंगा नदी पात्राची दुरावस्था झालेली दिसत आहे.
कधीकाळी स्वच्छ व नितळ पाण्याने बारामाही खळखळून वाहणारे नदी पात्र नळगंगा धरणाच्या निर्मितीमुळे कालांतराने ओस पडत गेले. केवळ पावसाळ्यातच नदीला पाणी वाहते राहीले. धरणातील अतिरिक्त पाणी सोडल्यामुळे नदीला पूर जाऊ लागले. या पुरात जुन्या गावातील मानवी वस्त्यांमधील मधील नाल्यांद्वारे सोडले जाणारे सांडपाणीही वाहत होते. त्यानंतर उन्हाळा ऋतुत वाढत्या तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊन नदीपात्र कोरडे पडते. असे चित्र कायमस्वरूपी दिसत होते. परिसरात ज्यावेळी दुष्काळी परिस्थिती निर्माण होवून पाणी टंचाई निर्माण झाली. त्यावेळी या परिस्थितीवर मात करण्याकरिता महसूल व नगर पालिका प्रशासनाच्या पुढाकाराने लोकसहभागातून नळगंगा नदीपात्रातील गाळ काढण्यात येऊन खोलीकरणाचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. या कामामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतात गाळ उपलब्ध होवून जमिनीला सुपीकता प्राप्त झाली. त्याचप्रमाणे पावसाळ्यातील पाण्याने नदीपात्र भरून परीसरातील विहीरी व बोरवेल या जलस्त्रोतांमध्ये मुबलक पाणी साठा निर्माण झाला. याचे श्रेय घेण्यासही पुढारी मागे राहिले नाही. इथपर्यंत या नदीपात्रात जलपर्णीचा लवलेशही नव्हता. गावगाड्यातील सांडपाण्याचे नाले बारामाही वाहते राहून या नाल्यातील संपूर्ण पाणी नदीपात्रात मिश्रीत होते. या बाबीची नगर पालिका प्रशासनाला व नेत्यांना जाण असूनही भविष्याचा वेध घेण्यात आला नाही. किंबहुना त्या दृष्टीने नियोजन करण्यावर कधीच भर देण्यात आला नाही. परिणामतः याच पाण्यावर जलपर्णीची हळू-हळू व्याप्ती वाढली. दूषित पाण्यामुळे नदी पात्रातील जलजीवांचे अस्तित्व संपुष्टात आले. सांडपाण्यामुळे नदी पात्राची हानी होत असतानांही केवळ जलपर्णी वर लाखो रुपये खर्च करण्यात आला. या चार-पाच वर्षात नगर पालिकेने जवळपास पंधरा लाख रुपये जलपर्णी काढण्यावर खर्ची केले. तरी जलपर्णीचे वास्तव्य आजही जैसे थे च राहीले. जलपर्णीचा योग्य पद्धतीने नायनाट कसा करता येईल या बाबीचा जणू कधी विचारच झाला नाही. जलपर्णी काढण्याच्या नावाखाली नगर पालिकेकडून केवळ ठेकेदारांना पोसण्यातच अप्रत्यक्षरीत्या धन्यता मानल्या गेली. त्यामुळे नगर पालिकेचा पैसाही गटारगंगेत व्यर्थच गेला असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
दूषित पाण्यावरील जलपर्णी वर जेवढा खर्च केला तेवढा खर्च जर गावगाड्यातील सांडपाणी नियोजनावर केला असता तर या नदीपात्रात कदाचित आजमितीस केवळ नैसर्गिक पाणीच तुंबलेले असते. एकीकडे गावगाड्यातील सांडपाणी सोडणे सुरू राहिले तर दुसरीकडे या दूषीत सांडपाण्यावर जलपर्णी जोमाने वाढत गेली अन्‌ जलपर्णी काढण्यावर नगरपालिका लाखो रुपये खर्च करत राहिली असा खेळ केवळ ठेकेदारांना पोसण्याकरीताच खेळण्यात आल्याचा आरोपही राजकीय पटलावरून होत आहे.
आता या जलपर्णीवर खर्च करण्यापेक्षा खऱ्या अर्थी नाल्याद्वारे सोडले जाणारे सांडपाणी नदीपात्रात सोडणे थांबविल्यास निश्‍चितच उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे नदीची स्वच्छता होवून जलपर्णीचा नायनाट होण्यासही नैसर्गिक रित्या हातभार लागू शकतो. तरी नगर पालिकेने जलपर्णी सह सांडपाण्याची योग्यरीतीने विल्हेवाट लावल्यास निश्‍चितच नळगंगेचा गुदमरलेला श्‍वास मोकळा होऊ शकतो असाही एक सामाजिक मतप्रवाह निर्माण झालेला दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here