जळगाव प्रतिनिधी
तालुक्यातील नंदगाव येथील जि.प.मराठी शाळेच्या मुख्य द्वारावरील सरपंच व सहकारीचे टाकलेले नाव हे बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे हे नावे तात्काळ हटविण्यात आली आहेत. याबाबतीत नंदगाव येथील ग्रामस्थांनी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देत तक्रार नोंदवली होती. यानंतर जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली.
नंदगाव येथील सरपंच भूषण पवार यांनी गावातील नुकत्याच बांधकाम झालेल्या सरकारी जि.प. शाळेच्या गेटवर बेकायदेशीररित्या स्वतःसह आपल्या सहका-याचे नाव टाकले होते.
नागरिकांनी याबाबतीत प्रशासनाकडे तक्रार केली. ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, गावातील जि.प. मराठी शाळेच्या इमारतीच्या मुख्य गेटचे काम नुकतेच ग्रामपंचायतीने चौदावे वित्त आयोग व रोजगार हमी योजनेतून ठेकेदाराकडून करून घेतलेले आहे. रेकॉर्ड मात्र बोगस पद्धतीने रो.ह.यो.चे दाखविलेले आहे. तसेच सदर गेटवर सरपंच याने बुद्धी पुरस्कर स्वतःचे व आपल्या सहका-याचे नाव टाकून गावातील शांतता भंग होईल, असे गैरकृत्य बेकायदेशीरपणे केलेले आहे. याकरिता ग्रामसभेचा अगर मासिक सभेचा ठराव नाही किंवा ग्रामपंचायत अधिनियमनुसार तसा ठराव करता येत नाही.
सदरील नावांमुळे शाळेत शिक्षणासाठी येणाऱ्या लहान विद्यार्थ्यांच्या बालमनावर व शिक्षकांच्या मनावर दुरगामी दुष्परिणाम होणार असून प्रशासनाने सदर प्रकरणाकडे लक्ष देऊन प्रकरणाची चौकशी करावी व सरकारी जि.प.शाळेच्या गेटवरील दोन्ही नावे त्वरित काढण्यात यावी व समस्त गावक-यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनामार्फत नंदगाव येथील नागरिकांनी प्रशासनाकडे केलेली होती.
याबाबतीत जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समिती नेमून योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. समितीच्या अहवालात गेटवर टाकलेली नावे ही बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे सदरची नावे तात्काळ हटविण्याचे आदेश देण्यात आले. सदर गेटवरील नावे जळगाव पं.स.चे गटविकास अधिकारी, ग्रामसेवक नंदगाव तथा नंदगाव जि.प.शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या सहकार्याने ग्रा.प. कर्मचारींच्या माध्यमातून हटविण्यात आली. यावेळी ग्रामस्थांना न्याय मिळाल्याची भावना जन-सामान्यांतून व्यक्त होताना दिसली.
“जि.प. शाळेच्या गेटवर सरपंचांनी बेकायदेशीररित्या स्वतःसह आपल्या सहका-याचे नाव टाकले होते. या नियमबाह्य नावांमुळे गावात शांतता भंग होण्याची शक्यता होती. तसेच या नावांमुळे शाळकरी विद्यार्थ्यांच्या बालमनावरही परिणाम झाला असता. म्हणून या बालिशपणाविरोधात आम्ही गावातील नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रार नोंदवली होती. प्रशासनाने योग्य ती कारवाई करत चुकीच्या गोष्टींना चपराक बसवली आहे.”
– स्वप्निल सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते, नंदगाव