धरणगाव : प्रतिनिधी
येथील धरणगाव – जळगाव रोडवर असलेल्या महाविर कॉटन नावाच्या कापसाच्या जिनिंग कंपनीतून अज्ञात चोरट्यांनी संरक्षण भिंत तोडून 25 क्विंटल कापसाची चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आला. या प्रकरणी धरणगाव पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की धरणगाव – जळगाव रोडवर महावीर कॉटन नावाच्या कंपनीत कापूस खरेदी विक्री केंद्र आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी करून साठा करण्यात आला आहे. रविवारी 23 जानेवारी रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी संरक्षण भिंत फोडून सुमारे 2 लाख 37 हजार रूपये किंमतीचा 25 क्विंटल कापूस चोरून नेला. सदर प्रकार आज सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास कंपनीचे मालक सुभाष काशीनाथ पाटील यांचे चिरंजीव देवा पाटील हे कंपनीत गेले असता त्यांच्या लक्षात आले. दरम्यान चोरट्यांनी संरक्षण भिंत फोडून वाहनाच्या मदतीने कापूस चोरून नेला आहे. याबाबत देवा पाटील यांनी धरणगाव पोलिस स्थानकात सदर माहिती दिली. माहितीवरून धरणगाव पोलिस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ यांच्यासह संदीप पाटील, जितेंद्र भदाणे आदींनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती जाणून घेतली. या संदर्भात देवा पाटील यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असून घटनेचा पंचनामा होऊन धरणगाव पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने तपास करीत असल्याचे समजते.