धानोरा ता.चोपडा ः वार्ताहर
कुटूंबात किरकोळ वाद सुरुच असतात बऱ्याचदा वाद हे आर्थिक विवंचनेतून होतांना दिसतात, मात्र अशा प्रसंगी घाई घाईत घेतलेले निर्णय आयुष्यात निराशेशिवाय काहीच येत नाही. याचा प्रत्यय येथून जवळच असलेल्या बिडगाव गावात आला आहे. कौटुंबिक वादातून पतीने विषप्राशन केल्याचे समजताच. पत्नीने आपल्या दोन मुलींसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चोपडा तालुक्यातील बीडगाव येथे विनोद विक्रम बाविस्कर(कोळी, वय 40) हे आपल्या कुटूंबासह रहिवासास आहेत. ते आपल्या पत्नी वर्षा विनोद बाविस्कर(वय 35), मुलगी खुशी विनोद बाविस्कर, किर्ती विनोद बाविस्कर, मोनाली विनोद बाविस्कर यांच्यासोबत राहतात. काल रात्री विनोद बाविस्कर यांचे त्यांचे आई, वडिल, भाऊ यांच्याशी आर्थिक कलहातून वादविवाद झाले. या भांडणाचा विनोद बाविस्कर यांच्यावर गंभीर परिणाम झाला. या मनस्तापात त्यांनी घरातील विषारी द्रव प्राशन केले. या घटनेत विनोद बाविस्कर यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तत्काळ जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असतांनाच सदर माहिती त्यांची पत्नी वर्षा विनोद बाविस्कर यांना समजल्याने त्यांनी या घटनेचा धक्का घेतला व कुठलाही विचार न करता बिडगाव शहरातील गट क्रं.234 इकबाल शहादूर तडवी यांच्या मालकीच्या विहिरीत किर्ती (वय 8), व मोनाली (वय 4) या दोघ मुलींना घेवून विहिरीत उडी घेवून आपली जीवनयात्रा संपविली. सुदैवाने मोठी मुलगी खुशी ही मामाच्या घरी गेली असल्याने ती या घटनेपासून दूर राहील्याने बचावली आहे..
दरम्यान, आज सकाळी पोलिस पाटील रामकृष्ण गोरख पाटील यांनी सदर माहिती अडावद पोलिस स्थानकात कळविली. या माहितीवरुन सपोनि किरण दांडगे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह दत्तू पाटील व छोटू तडवी यांना सहाय्यतेसाठी घेत विहिरीत शोध मोहिम हाती घेतली. यात तीन तासाच्या प्रयत्नानंतर दोघ मुलीचे प्रेत हाती आले व त्यानंतर विहिरीचे पाण्याचा उपसा केल्यानंतर वर्षा बाविस्कर यांचा मृतदेह हाती आला. तिघही मृतदेह शवविच्छेदनासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेचे वृत्त कळताच डीवायएसपी भास्कर डेरे यांनी घटनास्थळी भेट दिली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा विनोद विक्रम बाविस्कर याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे समजते.