देशातील परदेशी चलनाच्या साठ्यात सातत्याने घट

0
6

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । देशामधील परदेशी मुद्रा म्हणजेच परकीय चलन गंगाजळीमध्ये मोठी घट झाली आहे. सात जानेवारी 2022 रोजी संपलेल्या आठवड्यामध्ये भारतामधील परकीय चलनामध्ये 87.8 कोटी डॉलर्सने घट झालीय. आता भारतामध्ये 632.736 अब्ज डॉलर एवढं परकीय चलन शिल्लक आहे. भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआयने यासंदर्भातील आकडेवारी जारी केली आहे. परदेशी गंगाजळीमध्ये सातत्याने होणारी घट ही केंद्र सरकारसाठी चिंता वाढवणारी गोष्ट आहे.

यापूर्वी 31 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या आटवड्यामध्ये परदेशी चलन हे 1.466 अब्ज डॉलर्सचे कमी होऊन 633.614 अब्ज डॉलर्सवर आले होते तर 24 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात परदेशी चलनामध्ये 58.7 कोटी डॉलरर्सची घट झाली होती. त्यावेळी परकीय चलन 635.08 अब्ज डॉलर्सपर्यंत आलेलं. 17 डिसेंबरला संपलेल्या आठवड्यात परकीय चलनाचा साठा 16 कोटी डॉलर्सने घसरुन 635.667 अब्ज डॉलर्स वर आला होता.

आरबीआयने काल जारी केलेल्या साप्ताहिक आकडेवारीनुसार सात जानेवारी रोजी जो आठवडा संपला त्यामध्ये परदेशी चलन साठ्यात मोठी घट झाली. ही घट प्रामुख्याने फॉरेन करन्सी ॲसेट (एफसीए) म्हणजेच परदेशी चलनामधून होणारी कमाई मंदावल्याने झाल्याचे सांगण्यात आलेय. एकूण परदेशी चलनाच्या साठ्यामध्ये एफसीएचा महत्वाचा वाटा असतो. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या अहवालानुसार सात जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात भारताच्या एफसीएमध्ये 49.7 कोटी डॉलर्सची घसरण झाली.

आता भारताचा एफसीए 569.392 अब्ज डॉलर्स इतका आहे. डॉलरच्या स्वरुपात सांगितल्या जाणाऱ्या एफसीएमध्ये परदेशी चलनाच्या साठ्यातील यूरो, पाऊंड, येनसारख्या इतर देशांच्या चलनांचे मुल्यांकन करुन त्याचाही विचार समावेश केलेला असतो तसेच याच आठवड्यामध्ये भारताचे गोल्ड रिझर्व्ह म्हणजेच सरकारी तिजोरीमधील सोन्याच्या एकूण साठ्याचे मूल्यही 36 कोटी डॉलर्सने कमी झाले आहे. हे मूल्य आता 39.044 डॉलर इतके आहे. सात जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात इंटरनॅशनल मॉनेट्री फंड म्हणजेच आयएमएफने देशाच्या एसडीआर म्हणजेच स्पेश ड्रोइंग राइट्सचे मूल्य 1.6 कोटी डॉलर्सने कमी करुन 19.098 अब्ज डॉलर्स इतके केलेय. आयएमएफने देशातील चलनाचा साठासुद्धा 50 लाख डॉलर्सने घसरल्याचे सांगत होत आता 5.202 अब्ज डॉलर्स असल्याचे सांगितलेय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here