जळगाव : प्रतिनिधी
शहरातील रखडलेली नालेसफाई दूषीत पाणीपुरवठा व अमृत योजनेअंतर्गत नळ कनेक्शनमुळे थांबलेली रस्त्यांची कामे या तीन मुद्यांवरून आजची महासभा गाजली. महापौर जयश्रीताई महाजन यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या या महासभेत 33 विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले असून त्यावर सभागृहात चर्चा सुरू झाली आहे. त्यात महिला मालमत्ताधारकांना करात 5 टक्के सूट देण्यात येणारा प्रस्ताव मंजूर झाल्याचे वृत्त असून ही शहरातील महिलांना मनपाकडून मिळालेली भेट समजली जात आहे. चर्चेत कैलास सोनवणे, विशाल त्रिपाठी, उज्ज्वला बेंडाळे, रिजवान खाटीक, सदाशिव ढेकळे आदींनी सहभाग घेतला.महापालिकेची महासभा आज सकाळी 11 वाजता मनपाच्या दुसऱ्या मजल्यावरील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात सुरू झाली. व्यासपीठावर महापौर जयश्रीताई महाजन यांच्यासह आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह नगरसचिव होते. सभेसमोरील 33 विषयांवर चर्चा सुरू होण्यापूर्वी नगरसेवकांनी शहरात अलिकडे झालेला दूषित पाणीपुरवठा व पावसाळा तोंडावर आला असतांना रखडलेली नालेसफाई व अमृत योजनेतील नळ कनेक्शनमुळे थांबलेली रस्त्यांची कामे या मुद्यावरून सभागृहात आवाज उठविला. त्यास महापौर जयश्रीताई महाजन यांनी खुलासेवार उत्तर देऊन नगरसेवकांचे समाधान केले.
मनपा आयुक्तपदी नियुक्तीनंतर विद्या गायकवाड यांच्या उपस्थितीत होणारी ही पहिलीच महासभा असून आयुक्त व महापौर या दोन प्रमुख पदांवर महिला आरूढ झाल्यामुळे शहरातील महिला मालमत्ताधारकांसाठी मालमत्ता करात 5 टक्के सूट देण्याचा प्रस्ताव या सभेत ठेवण्यात आला व त्यास मंजुरी मिळाल्याचे वृत्त आहे. याशिवाय गेल्या अनेक वर्षापासून अपूर्णावस्थेत असलेल्या 800 हून 2अधिक घरकुलांची जागा म्हाडाला देण्याबाबतचा प्रस्ताव देखील या महासभेत ठेवण्यात आला असून त्यावर चर्चा सुरू झाली आहे.