दूध संघ, जिल्हा परिषद,पंचायत निवडणूक !

0
72

जळगाव ः विशेष प्रतिनिधी

जिल्ह्याच्या राजकारणात भाजपचे पूर्व नेते माजीमंत्री तथा सद्य स्थितीतील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे व भाजपचे गिरीश महाजन यांच्यातील वितुष्ट सर्वश्रुत आहे त्याचप्रमाणे जिल्हा पालकमंत्री व शिवसेना नेते गुलाबराव पाटलांचेही खडसे यांच्याशी सख्य नाही.अर्थात महाजन व गुलाबराव दोन्हीही वजनदार नेते खडसेंच्या विरोधात आहेत आणि उल्लेखनीय की, राज्यात भाजप-शिवसेनेची युती नसली तरीही या दोघा नेत्यांचे गळ्यात गळे आहेत हे लपून राहिलेले नाही.याचा परिणाम येत्या जिल्हा दूध संघ,जिल्हा परिषद,पंचायत समित्या तसेच बाजार समित्या व नगरपालिका निवडणुकात होणे निश्चित असून खडसे यांचे वर्चस्व कमी करण्यासाठी गुलाबराव पाटील व गिरीश महाजन यांच्या दोस्तीने नवे राजकीय समीकरण होण्याची चिन्हे असून तसे झाल्यास जिल्ह्यातील आघाडीत बिघाडी होण्याचीच शक्यता वर्तविली जात आहे.
स्थानिक राजकारणात विशेष करून सहकारात राजकारण नसल्याचे राजकारणी लोक व नेते म्हणतात.त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकीत सर्वच विरोधी व सत्ताधारी नेते गळ्यात गळे घालून रिंगण घालतात.येनकेन प्रकारे संबंधित संस्थेत आपले वर्चस्व राहावे किंवा ती आपल्या ताब्यात राहावी हा त्यामागील शुद्ध हेतू असतो. जिल्ह्यासह राज्यात अशी अनेक उदाहरणे आहेत.जळगाव जिल्हाही त्याला अपवाद नाही.येथील चित्र मात्र वेगळे आहे.
माजीमंत्री एकनाथरान खडसे यांचा एकेकाळी जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात बोलबाला होता.त्यावेळी जिल्ह्यातील भाजपचे दुसरे नेते व मंत्री गिरीश महाजन दुसऱ्या क्रमांकावर होते. पुढे खडसेंचे ग्रहमान बदलले .त्यांच्यावर अनेक आरोप झाले ,त्यातून त्यांचे मंत्रिपद गेले.त्यांच्या मागे चौकाशांचा फेरा सुरू झाला.परिणामी खडसे यांचे राजकीय वर्चस्वाला काहीसा धक्का बसून भाजपने त्यांना वाळीत टाकले.त्यांचे पुनर्वसन केले नाहीच ,उलटपक्षी त्यांच्याजागी गिरीश महाजन यांना महानता प्राप्त झाली.तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनीही का व कुणास ठाऊक (कदाचित खडसे यांचे खच्चीकरण करण्यासाठी) महाजन यांनाच जास्त महत्व देणे व त्यांना जवळ करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला.त्यातूनच मग खडसे समर्थक आणि कार्यकर्त्यांचा महाजन यांच्यावर रोष निर्माण झाला व तो वाढतच गेला.पुढे खडसे यांना त्यांच्या मुक्ताईनगर मतदार संघातून विधासभेची उमेदवारी नाकारण्यात आली.त्यांच्या ऐवजी त्यांच्या कन्येस उमेदवारी देऊन (भाजपवासीयांनीच ?) रोहिणी-खडसे खेवलकर यांना पाडण्यास हातभार लावल्याचे मुक्ताईनगरातील कार्यकर्ते छातीठोक सांगतात.
उल्लेखनीय की, भाजपचा अधिकृत उमेदवार असतांना खडसे परिवार संपविण्यासाठी राष्ट्रवादीसह, काँग्रेस व आतून भाजपनेही शिवसेनेचे पण अपक्ष निवडणूक लढणाऱ्या चंद्रकांत पाटलांना साथ दिली.त्यावेळी व्हायचे तेच झाले व भाजपच्या
विरोधातील सर्व पक्ष(राष्ट्रवादी,भाजप व शिवसेना)एकवटल्याने खडसे कन्येचा पराभव झाला.
गिरीश महाजन हे जाहीरपणे नाकारत असले तरीही मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील (शिवसेना )यांच्याशी त्यांची किती जवळीक आहे हे बोदवड नगरपंचायत निवडणुकीत दिसून आले आहे.वास्तविक बोदवडमध्ये आधीच्या निवडणुकीत खडसे यांच्या नेतृत्वात भाजपने निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले होते आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकीत गिरीश महाजन यांनी ते वर्चस्व कायम न ठेवता,फक्त आणि फक्त खडसे यांना दूर ठेवण्यासाठी शिवसेनेच्या चंद्रकांत पाटील यांच्याशी हातमिळवणी करीत शिवसेनेला बहुमत मिळू दिले तर सत्ता असलेल्या भाजपाच्या पदरात फक्त एक जागा मिळाली.किती हा व्यक्ती द्वेष ? भलेही स्वपक्षाचे नुकसान झाले तरी चालेल ,पण खडसेंच्या वर्चस्वाला धक्का लागलाच पाहिजे ही प्रामाणिक नीती.
त्या खडसे द्वेषातूनच की काय ,कोण जाणे पालकमंत्री गुलाबराव पाटील (सेना) व गिरीश महाजन जवळ आल्याचे म्हणतात.दोघांचा दुश्‌‍मन एकच व “दुश्‌‍मन का दुश्‌‍मन अपना दोस्त“ या नीतीने दोघांची गट्टी जमली.पहा,राज्यात शिवसेना,राष्ट्रवादी व काँग्रेस या महाविकास आघाडीची सत्ता व भाजप विरोधात असतांना जळगावच्या राजकारणात मात्र पालकमंत्री गुलाबराव पाटील(शिवसेना)व गिरीश महाजन (भाजप)यांचे गळ्यात गळे आहेत.गुलाबराव जामनेरात महाजनांच्या दारी जातात,चहापान करतात,हास्य विनोदात रंगतात नी त्यांचे कार्यकर्ते म्हणजे दोघांचे (पाटील-महाजन)बाहेर एक दुसऱ्या विरोधात घोषणाबाजी करतात, आहे की नाही गंमत.
नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीविरुद्ध भाजप अशी लढत होणे अपेक्षित असतांना तसे झाले नाही.वस्स्तविक जिल्हा बँक आपल्या ताब्यात ठेवण्याचे आव्हान गिरीश महाजन यांच्यासमोर होते परंतु कुठे,काय व कशी तडजोड झालीं हे कुणा कळले नाही.भाजपने अर्थात महाजन यांनी त्या निवडणुकीतून सपशेल माघार घेतली व महाविकासची एकतर्फी फत्ते झाली.
जिल्हा बँकेप्रमाणे आता जिल्हा दूध संघ व जिल्हा परिषद निवडणुकांचा धुराळा उडणार आहे.दूध संघात गेल्या निवडणुकीत जिल्हा बँकेप्रमाणेच खडसे यांच्या नेतृत्वात भाजपची सत्ता होती तर जिल्हा परिषदेत भाजपाचेच वर्चस्व पण सेनेच्या पाठिंब्याने भाजपची सत्ता आहे.या दोन्ही ठिकाणी सत्ता कायम ठेवण्याचे महाजन यांच्यासमोर आव्हान असणार आहे परंतु महा आघाडीतील मित्रपक्षाचे नेते पालकमंत्री गुलाबराव राज्याच्या सत्तेतील भागीदार मित्रपक्ष राष्ट्रवादीशी सामोपचाराने वागतील काय ? अर्थात खडसे यांच्याशी जुळवून घेतील काय ? हा प्रश्न आहे.जिल्हा परिषदेतही शिवसेना सदस्यांनी सातत्याने भाजप कडून सापत्न वागणुकीचा आरोप केलेला आहे.
आता नुकत्याच होणाऱ्या निवडणुकीत गुलाबराव पाटील व एकनाथराव खडसे यांनी आघाडी धर्म पाळून हातात हात घेतला तर जिल्ह्यातून भाजपचे वर्चस्व संपण्यास वेळ लागणार नाही.पण गुलाबरावांनी त्यासाठी स्वपक्षाचे हित जोपासण्यासाठी महाजन यांच्याशी
सलोखा जरूर ठेवावा पण तो निवडणुकीत नसावा असे शिवसेना कार्यकर्त्यांचेच म्हणणे आहे. तसे न झाल्यास दूध संघ व जिल्हा परिषद निवडणुकीत वेगळे चित्र दिसेल.आघाडीत बिघाडी तर होईलच व भाजप -शिवसेना युतीचे नवे समीकरण दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here