साईमत, अक्कलकुवा । प्रतिनिधी
योजनेचा लाभ देताना कोणीही कोणावर उपकार करत नाही. शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम लोकप्रतिनिधींचे असते. जिल्ह्याच्या दुर्गम भागाचा विकास करायचा असेल तर अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेच्या झेंडा फडकवा, असे आवाहन माजी आमदार तथा शिवसेनेचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी केले. रविवारी सकाळी धडगाव येथे आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) बैठक घेण्यात आली. त्याप्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य विजय पराडके, नगराध्यक्ष धनसिंग पावरा, नंदुरबारचे माजी नगरसेवक कुणाल वसावे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जामसिंग पराडके, उपसभापती भाईदास अगे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सदस्य संदीप वळवी, शहरप्रमुख दिलवरसिंग पावरा, युवासेना जिल्हाप्रमुख योगेश पाटील, जिल्हा महिलाप्रमुख विद्या वळवी, मुख्यमंत्री जनकल्याण लोकसभाप्रमुख नीलेश हिरे,सरपंच गणेश ठाकरे, गणपत ठाकरे, माधव पावरा, रेट्या वळवी, पंचायत समितीचे सदस्य दिलीप पाडवी आदी उपस्थित होते.