जळगाव : प्रतिनिधी
शहरातील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालाजवळ दुचाकी दगडावर आदळल्याने झालेल्या अपघातात तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील कुसूंबा येथील इंदिरानगरातील रहिवासी गुलाब नवल बाविस्कर (वय- ३८) हे गुरुवार ५ मे रोजी रात्री ११ वाजता एमआयडीसीतून महामार्गाकडे दुचाकीने जात होते. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालाजवळ त्यांची दुचाकी दगडावर आदळल्याने त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात गुलाब यांच्या डोक्याला, छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्या नाकातोंडातून रक्त आले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, विकास सातदिवे व गणेश शिरसाळे यांच्यासह तेजस खाचने या नागरिकाने घटनास्थळी धाव घेत गुलाब यांना रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात हलविले. या ठिकाणी डॉक्टरांनी त्याची तपासणी करीत त्याला मयत घोषित केले. खिशातील आधारकार्ड व मोबाईलवरून मृतांची ओळख पटली. पोलिसांनी मृताच्या वडिलांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. गुलाब यांची पाईप तयार करण्याची मशीन असून ते एमआयडीसीत ते पाईप तयार करतात. त्यांच्या पश्चात पत्नी आई वडील व दोन मुले असा परिवार आहे.



