भुसावळ : प्रतिनिधी
मार्चअखेर असल्याने पालिकेने थकीत गाळेधारकांवर कारवाई सुरु केली आहे. शुक्रवारी झालेल्या कारवाईत पालिकेच्या तीन व्यापारी संकुलातील 11 गाळे सील करण्यात आले. या मोहिमेत 8 लाख 60 हजारांचा कर वसूल करण्यात आला. 31 मार्चपर्यंत व त्यानंतरही ही कारवाई सुरूच राहील.
पालिकेची यंदाची कर वसुली अवघी 26 टक्क्यांपर्यंत आहे. शहरात पालिकेचे 1,260 गाळे आहेत. मात्र, गाळे धारकांकडून अल्प रक्कम थकीत असूनही वेळेत भरणा होत नाही. यामुळे पालिकेने थकबाकी वसुलीची धडक वसुली मोहीम सुरू केली आहे. शनिवारी पालिका पथकाने शहरातील महात्मा गांधी मार्केट (डी.एस.हायस्कूल मार्केट), पालिका रुग्णालय मार्केट व छत्रपती शिवाजी महाराज संकुलातील 11 गाळे थकबाकीपोटी सील केले. या कारवाईपूर्वी काही गाळे धारकांनी थकबाकी भरल्याने 8 लाख 60 हजार रुपये थकबाकी वसूल झाली.
मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी परवेज शेख, चेतन पाटील, गोपाळ पाली, अनिल भाकरे, राजेंद्र चौधरी, जय पिंजाणी, अभय विणेवाल आदींनी ही कारवाई केली. या कारवाईने थकबाकीदार गाळेधारकांचे धाबे दणाणले आहे.



