अमळनेर ः प्रतिनिधी
डॉ. एपीजे अब्दुल कलाम स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चैलेंज-२०२१ स्पर्धेत अमळनेर येथील अॅड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी गार्गी अजय पाटील हिची निवड झाली असून नुकतीच पुणे येथे उपग्रह निर्मीतीची कार्यशाळा संपन्न झाली.
डॉ.एपीजे अब्दुल कलाम इंटरनेशनल फाऊंडेशन आणि द्वारा स्पेस झोन इंडिया आयोजित स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चैलेंज २०२१ साठी वरील प्रमाणे विविध गट अनेकांचे मागणी वरून निर्माण करून जागतिक, आशिया, इंडिया रेकॉर्डसाठी संधी उपलब्ध करून दिली आहे. १०० पेलोड उपग्रह बनवून हेलियम बलूनद्वारे अवकाशात नेण्याच्या या प्रकल्पात आता शालेय विद्यार्थ्यांना सामील होता येईल. शालेय जीवनातच स्पेस टेक्नॉलॉजीची जिज्ञासा आता निर्माण होऊन भविष्यात स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये हे विद्यार्थी नक्कीच आपले योगदान देतील. खास महाराष्ट्रातील मुलांसाठी मराठी मधून प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षक सज्ज केलेले होते. दि.१९ जानेवारीला पुण्यातील हडपसर येथील जंयवंतराव सांवत अभियात्रिकी महाविद्यालयात उपग्रह बनविण्याच्या प्रकल्पात गार्गी सहभागी झाली होती. यामुळे स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज प्रकारचा उपग्रह म्हणजे काय, त्याचे विविध भाग कुठले? त्यांचे कार्य कसे चालते? हेलियम बलून म्हणजे काय? या प्रकारचे उपग्रहाचे बाहेरील कवच कुठल्या वस्तूंचा वापर करून बनवितात? या उपग्रहात अभ्यासासाठी कुठले सेंसर असतात? कुठले सॉफ्टवेअर वापरायचे? अशी सर्व माहिती शालेय विद्यार्थ्यांना मराठी मधूनच दिली गेली.
जगात सर्वात कमी वजनाचे (२५ ग्रॅम ते ८० ग्रॅम) १०० उपग्रह बनवून आणि त्यांना ३५ हजार ते ३८ हजार मीटर उंचीवर हाय अल्टीट्युड सायन्टिफिक बलूनद्वारे प्रस्थापित केले जातील. उपग्रह एका केसमध्ये फिट केलेले असतील. या केस सोबत पॅराशूट, जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम, लाईव्ह कॅमेरा जोडलेला असेल. तेथून प्रत्यक्ष ओझोन, कार्बनडायऑक्सिड हवेची शुद्धता, हवेतील प्रदूषण, हवेचा दाब आणि इतर माहिती हे उपग्रह पृथ्वीवरील केंद्राला पाठवतील. या पेलोडसोबत काही झाडांच्या बीज सुद्धा पाठवण्यात येत आहे. यामुळे कृषी विभागास अवकाशातील शेती करण्याच्या संशोधनास मदत मिळेल आणि यामुळे हे विद्यार्थ्यांची खालील विक्रमांमध्ये नोंद केली जाईल.यात जागतिक विक्रम, आशिया विक्रम, इंडिया विक्रम, गिनीज बुक जागतिक विक्रम, असिस्ट जागतीक विक्रम. यांचा समावेश आहे.
यात प्रत्येक विद्यार्थ्यास वरील प्रमाणपत्र स्वतंत्र नावाने मिळतील. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये स्पेस संबधी संशोधनाची आवड निर्माण होऊन भविष्यात त्यांना करियर बनविताना नक्की उपयुक्त ठरेल. हा उपक्रम दि.७ फेब्रुवारी रोजी कलाम कुटुंबियांद्वारे रामेश्वरम येथून राबविला जात असून महाराष्ट्रामध्ये मनिषाताई चौधरी (महाराष्ट्र राज्य समन्वयक, डॉ.एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन) यांच्या नेतृत्वात यशस्वी होत आहे. गार्गी ही लोकमत वृत्तपत्र समुहात विपणन अधिकारी अजय पाटील यांची मुलगी आहे. गार्गीचे स्कूलच्या अध्यक्षा अॅड.ललिता पाटील, सचिव शाम पाटील, संचालक पराग पाटील, देवश्री पाटील, प्राचार्य विकास चौधरी व सर्व शिक्षकवृंद यांनी कौतुक केले.