जळगाव : प्रतिनिधी
शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना शेती आणि शेती उद्योगाची चालना मिळावी या मुख्य उद्देशाने गत 7 वर्षांपासून जैन हिल्स येथे संम्मेलन भरविण्यात येत आहे. गुजरात व महाराष्ट्रातील राज्यातील 135 शाळांतील 11 हजार विद्यार्थ्यांमधून 800 विद्यार्थ्यांची निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या या 8 व्या संम्मेलनाचे आयोजन 1 ते 5 जून दरम्यान जैन हिल्स येथे करण्यात आलेले आहे. 1 व 2 तसेच 4 व 5 जून अशा दोन टप्प्यात हे संम्मेलन होईल.
शाळाशाळांमधून फालीच्या माध्यमातून सुमारे 25 हजार हून अधिक विद्यार्थ्यांना शिकविण्यात आलेले आहे. फाली व गोदरेज ग्रुपचे अध्यक्ष नादीर गोदरेज , यूपीएलचे अध्यक्ष रजनिकांत श्रॉफ, जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष अनिल जैन , नॅन्सी बेरी – उपाध्यक्ष असोसिएशन फॉर फाली यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या संम्मेलनाच्या माध्यमातून शिक्षण घेऊन अनेक कृषी उद्योजक यशस्वी झालेले आहेत हे या संम्मेलनाचे फलीत म्हणता येईल. अशा 6 यशस्वींचे अनुभव कथन विशेष महत्त्वाचे ठरणार आहे.
शालेय विद्यार्थ्यांसाठी फालीमुळे शेतीकडे उत्तम करियर म्हणून तसेच ते उदरनिर्वाहाचे सुयोग्य साधन आहे अशी दृष्टी विद्यार्थी व पालकांमध्ये आलेली आहे. फालीत सहभागी विद्यार्थी आपल्या शेतकरी पालकाला त्याला मिळालेल्या शेतीविषयक ज्ञानाचा त्याच्या शेतीसाठी उपयोग करू लागला आहे. विद्यार्थ्यांनी आधुनिक शेतीपद्धती त्यांच्या कौटुंबिक शेतीत वापरायला सुरवात केल्यामुळे उत्पादनात वाढ झाली व पर्यायाने कौटुंबीक आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे. फालीमुळे कृषिव्यवसायाचा समृद्ध मार्ग गवसला आहे. फालीच्या आठव्या संम्मेलनास गोदरेज ॲग्रोव्हेट, जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड, युपीएल, स्टार ॲग्री आणि ओमनीव्होर या कृषी क्षेत्रातल्या अत्यंत नावाजलेल्या कंपन्यांचे सौजन्य लाभलेले आहे.