साईमत, वरणगाव : प्रतिनिधी
वरणगाव नगर परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेण्याबाबतीत भुसावळ विभागाचे प्रांताधिकारी तथा नगर परिषदेचे प्रशासक जितेंद्र पाटील यांनी बुधवारी, ६ डिसेंबर रोजी वरणगाव नगर परिषद कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी थकीत कर वसुली, पाणी पुरवठा बाबतीत आढावा घेऊन नगर परिषदेच्या नवीन इमारतीची पाहणी केली.
वरणगाव नगर परिषदेचा प्रशासकीय कारभार चार वर्षापासून प्रशासक म्हणून भुसावळ विभागाचे प्रांताधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे नगर परिषदेचा कारभार प्रशासक व मुख्याधिकारी यांच्याकडे आहे. तेच शहराच्या विकासाची सुत्रे हलवित आहेत. मात्र, यापूर्वी असलेले प्रशासक रामसिंग सुलाणे यांचे वरणगाव नगर परिषदेच्या कामकाजाकडे फारसे लक्ष नव्हते. त्यांनी वरणगावात मोजक्याच कार्यक्रमावेळी हजेरी लावली होती. त्यामुळे बहुतांश कामांबाबतीत निर्णय घेणे मुख्याधिकाऱ्यांना अडचणीचे ठरत होते. यानंतर प्रशासकाचा कारभार भुसावळ विभागाचे प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यांनी बुधवारी वरणगाव नगर परिषदेला भेट देवून कामकाजाचा आढावा घेतला. यामध्ये थकीत कर वसुली, पाणी पुरवठ्याची समस्या तसेच नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली. याबाबत त्यांच्याशी दै.‘साईमत’च्या प्रस्तुत प्रतिनिधीने संवाद साधला. तेव्हा त्यांनी जुन्या इमारतीला १०० वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला असून ही इमारत जिर्णावस्थेत आली असल्याने धोकेदायक ठरत आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षाची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असल्याने कर्मचाऱ्यांच्या व इतर नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होवू शकतो. तसेच कोट्यावधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या नवीन इमारतीचे काम अंतीम टप्प्यात आले असल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्याधिकारी समिर शेख व नगर परिषदेच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रांताधिकारी तथा प्रशासक जितेंद्र पाटील यांनी दिलेली भेट ही नगर परिषदेचे नवीन इमारतीत स्थलांतर होण्याचे संकेत मिळत असल्याचे दिसून येत आहे.
कृती समितीच्या भुमिकेकडे लक्ष
शहराचा विस्तार हा बसस्थानक व रेल्वेस्थानक परिसराकडे मोठ्या प्रमाणात झाला आहे. नवनवीन व्यापारी संकुले, मॉल, तलाठी कार्यालय, पोष्ट कार्यालय, बँका यासह शाळा व महाविद्यालयही याच भागात असल्याने शहरातील नागरिकांची याच भागात मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे जुने गावातील बहुतांश व्यावसायिकांनी या भागाकडे आपल्या व्यवसायाला प्राधान्य दिले आहे. जुने गावात जेडीसीसी बँक, नगर परिषद कार्यालय व काही मोजकेच व्यवसाय सुरू आहेत. त्यातच नगर परिषद कार्यालय रेल्वेस्थानकाकडे स्थलांतरीत झाल्यास गावातील वर्दळ कमी होईल व त्याचा परिणाम सद्यस्थितीत सुरु असलेल्या व्यावसायिकांच्या व्यवसायावर होणार आहे. त्यामुळे नगर परिषदेचे कार्यालय जुने गावातच असावे, यासाठी नगर परिषद स्थलांतर विरोधी कृती समितीने मोठ्या प्रमाणात आंदोलन केले होते. मात्र, सद्यस्थितीत नगर परिषदेचा कारभार नवीन इमारतीत स्थलांतरित करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याने कृती समितीच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने गावामध्ये समतोल राखण्यासाठी इतर शासकीय कार्यालय निर्माण करावे. तसेच नगर परिषदेमध्ये जोपर्यंत नवीन कार्यकारिणी मंडळ स्थापन होत नाही, तोपर्यंत प्रशासनाने नगर परिषद कार्यालय स्थलांतर करण्याचा विचार करू नये, असे कृती समितीचे सचिव महेश सोनवणे यांनी सांगितले.