जळगाव ः प्रतिनिधी
जिल्ह्यात आज शुक्रवारी चार ठिकाणी कोरोना लसीकरणाचा ‘ड्राय रन’ घेण्यात आली. शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी), महापालिकेचे शिवाजीनगरातील डी.बी. जैन हॉस्पिटल, तालुक्यातील धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र व जामनेर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी सकाळी ८ वाजता या लसीकरणाच्या रंगीत तालमीला सुरुवात झाली. प्रत्येक केंद्रावर २५ जणांना डमी लसीकरण करण्यात आल्याचे वृत्त आहे.
आज सकाळी शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना डमी लसीकरणाची सुरूवात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्हा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.एन.एस.चव्हाण आदींची उपस्थिती होती.
‘ड्राय रन’मध्ये नोंदणी ते दुसरी लस देण्यापर्यंत आठ टप्पे आहेत. ड्राय रनसाठीच्या उपाययोजनांची पाहणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण व अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी काल केली. जिल्ह्यात २० हजार आरोग्य कर्मचार्यांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येणार आहे. त्यासाठी हा ड्राय रन घेण्यात येत आहे त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वॉर्ड क्रमांक २१० मधून जिल्हा नर्सिंग केंद्र येथील लसीकरण केंद्रापर्यंत लस पोहोचवणे, लाभार्थींची खातरजमा, नोंदणी, पहिली लस दिली जाईल. त्यानंतर नोडल ऑफिसरसह दोन जण रुग्णांशी संवाद साधून विचारपूस करतील, अर्धातास निरीक्षण केले जाईल.त्यानंतर दुसर्यांदा लस देण्यात येईल.
दृष्टिक्षेपात लसीकरण
जिल्ह्यात चार ठिकाणी आज होत असलेल्या ‘ड्राय रन’साठी प्रत्येक केंद्राकरिता स्वतंत्र नोडल ऑफिसर नियुक्त करण्यात आले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सीएस कार्यालयाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. यू. बी. तासखेडकर व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जयकर, पालिकेच्या डी. बी. जैन रुग्णालयासाठी डॉ. राम रावलानी, जामनेर उपजिल्हा रुग्णालयासाठी डॉ. विनय सोनवणे व जळगाव तालुक्यातील धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी डॉ. समाधान वाघ यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या केंद्रांवर लस घेणार्या व्यक्तीची आरोग्य तपासणी होईल. त्याचे सॅनिटायझेशन करण्यात येईल. लस टोचून झाल्यावर निरीक्षण नोंदवण्यात येईल. आज सकाळी ८ वाजता ड्राय रन ला सुरुवात झाली.शीतगृहातून व्हॅक्सिन कॅरिअरमधून लसीकरण केंद्रापर्यंत लस पोहोचवण्यात आली. लसीकरणाच्या आठ टप्प्यांसाठी लागणार्या वेळेची सतत नोंद घेण्यात येत आहे. त्यासाठी खास कंट्रोल रूम तयार करण्यात आले आहे ज्यात आरोग्य कर्मचार्यांची तपासणी, सॅनेटाइज केले गेले.
काय आहे ड्राय रन
‘ड्राय रन’ म्हणजे लसीकरणाच्या प्रक्रियेची रंगीत तालीम आहे. अर्थात या ‘ड्राय रन’मध्ये सगळं काही तेच होईल जे की प्रत्यक्ष लसीकरण मोहिमेत केले जाणार आहे. यात फक्त कोविड-१९ लस लावली जाणार नाही.शीतगृहापासून डमी लसीचा साठा केंद्रापर्यंत आणणे, या ठिकाणी होणार्या गर्दीचे व्यवस्थापन करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे प्रात्यक्षिक याची प्रत्यक्ष तालीम करण्यात आली. या सर्व बाबींसाठी लागणार्या प्रत्यक्ष वेळेची नोंद घेत निरीक्षण केले गेले.