जळगाव : प्रतिनिधी
जिल्हा वार्षिक योजना अर्थात डीपीडीसीच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील १४८ गावांना ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी अनुदाने या योजनेतून स्मशानभूमि बांधकाम व सुशोभीकरण करण्यासाठी प्रत्येकी १० लक्ष प्रमाणे १४ कोटी ८० लक्ष रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी १३ कोटी ३२ लक्ष निधी जिल्हा परिषदेला वितरीत देखील करण्यात आलेला आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यामार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया व नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांच्या नियोजनामुळे जिल्ह्यातील ज्या गावांना अद्यापपर्यंत स्मशानभूमीचे बांधकाम झालेले नव्हते अशा सर्वच ठिकाणी स्मशानभूमींची कामे मार्गी लागली आहे. तर, यामुळे अंत्यसंस्कार करतांना होणाऱ्या अडचणी दूर होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून ग्राम विकासाच्या विविध कामांना प्रचंड गती प्रदान करण्यात आलेली आहे. यात स्मशानभूमींचे बांधकाम आणि सुशोभीकरणाच्या कामाला देखील प्राधान्य देण्यात आलेले आहे. या अनुषंगाने जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी अनुदाने या योजनेतून स्मशानभूमि बांधकाम व सुशोभीकरण करण्यासाठी १४८ गावांना १४ कोटी ८० लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे. यात प्रत्येक गावाला १० लाखांचा निधी मिळाला असून यातील ५ लाख बांधकामासाठी तर ५ लाख सुशोभीकरणासाठी अशी तरतूद करण्यात आलेली आहे. यामुळे जिल्ह्यातील १४८ गावांमधील स्मशानभूमींचे रूपडे पालटणार आहे.
जिल्ह्यात स्मशानभूमींच्या कामांना प्राधान्य देण्यात आले असून विशेष बाब म्हणजे तरतूद करण्यात आलेली निधीपैकी ९० % निधी १३ कोटी ३२ लक्ष निधी वितरीत देखील करण्यात आलेला आहे. यामुळे आता १४८ गावांची कामे देखील मार्गी लागणार आहेत. या माध्यमातून आता जिल्ह्यातील १४८ गावांमधील स्मशानभूमींची कामे पूर्णत्वाकडे येणार आहेत.
दरम्यान, या संदर्भात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, स्मशानभूमींमध्ये सुविधा नसली तर अंत्यसंस्कार करतांना अनेक अडचणी येत असतात. विशेष करून पावसाळ्यात खूप मोठी गैरसोय होत असते. हीच बाब लक्षात घेऊन जिल्हा नियोजनच्या माध्यमातून स्मशानभूमींच्या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. यातच आता नव्याने मंजूर करण्यात आलेल्या कामांमुळे सदर गावांमधील जनतेला अंत्यसंस्कारासाठी होणारा त्रास कमी होणार आहे.
ज्या गावांमध्ये स्मशानभूमी बांधकाम झालेले नव्हते अश्या जिल्ह्यात अश्या १४८ ठिकाणी स्मशानभूमी बांधकामांना व सुशोभीकरणाच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात याव्या असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांना दिले होते. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नुकतेच जिल्ह्यात १४८ स्मशानभूमी बांधकामांना व सुशोभीकरणाच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली असून त्यात अमळनेर – १६ , भडगाव – ०९, बोदवड – ०३, भुसावळ – ०२, चाळीसगाव – १० , चोपडा – ०७ , धरणगाव – ०७, एरंडोल – ०६, जळगाव -२२, जामनेर – १० , मुक्ताईनगर – ११, पाचोरा – २० , पारोळा – १४ , रावेर – ०८ व यावल – ०४ अश्या १४८ स्मशानभूमी बांधकाम व सुशोभीकरण होणार आहे.
