जळगाव ः प्रतिनिधी
सिव्हिलच्या आवारात सुमारे 90 हजार स्क्वेअर फूट जागेत तीन मजली 100 खाटांचे माता व बालसंगोपन केंद्र येत्या 18 महिन्यांत उभारण्यात येणार आहे. या केंद्रात 5 लेबर रूम, 4 ऑपरेशन थिएटर, 20 डिलिव्हरी टेबल, 3 महिला, 2 लहान मुलांचे वॉर्ड, 4 बेडचा अतिदक्षता कक्ष, सोनोग्राफी केंद्र आदींचा समावेश असेल.जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते काल या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
कार्यक्रमास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पंकज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शासनाकडून माता-बालसंगोपन केंद्राला 2020-21 मध्ये मंजुरी मिळाली असून, 29 कोटी 95 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे. केंद्राची उभारणी ही सिव्हिलच्या सध्याच्या एआरटी सेंटर, वाहन दुरुस्ती विभाग, प्रवेशद्वार क्रमांक दोनचा रस्ता या परिसरात 8373.25 स्क्वेअर मीटर (90 हजार स्क्वेअर फूट) जागेत करण्यात येणार आहे.
अशी असेल रुग्णसेवेची व्यवस्था
पहिला मजला ः लेबर रूम, चार बेडचा अतिदक्षता विभाग, लहान मुलांचा कक्ष, नवजात बालकांचा कक्ष, डॉक्टर्स व परिचारिकांचा कक्ष, तपासणी कक्ष, प्रयोगशाळा, औषधसाठा, डिस्पेन्सरी.
दुसरा मजला : एएनसी-पीएनसी कक्ष, ऑपरेशन थिएटर, डॉक्टर्स ओपीडी कक्ष, आशा सेविका कक्ष, अतिदक्षता कक्ष.
तिसरा मजला : एमएनसीयू कक्ष, केएमसी कक्ष, लहान मुलांचा कक्ष, कर्मचारी कौशल्य प्रशिक्षण कक्ष, डॉक्टर व नर्स यांचा कक्ष.
तळमजला : पार्किंगची व्यवस्था असणार आहे.