जळगाव ः प्रतिनिधी
जिल्हा एकता मराठा फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांचे 4 ते 10 एप्रिल दरम्यान शिवतीर्थ मैदान येथे डे-नाईट सामन्यांचे आयोजित करण्यात आलेले आहे. त्या अंतर्गत 10 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक,मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह शासकीय अधिकाऱ्यांच्या संघाचा एकता मराठा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत क्रिकेटचा सामना रंगणार आहे.
मराठा क्रिकेट लीग राज्यस्तरीय सामन्यांचे उद्घाटन 4 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता आमदार चिमणराव पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक जळगाव जिल्हा एकता मराठा फाउंडेशनचे कार्याध्यक्ष गोपाल दर्जी यांनी केले.या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, जि.प. सदस्य रविंद्र पाटील, जळगाव जिल्हा एकता मराठा फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद सोनवणे, सचिव सागर पाटील, उपाध्यक्ष युगंधर पवार व सदस्य दीपक आर्डे, शेखर पोळ, सुनील सोनवणे, प्रविण पाटील उपस्थित होते. सचिन पाटील यांनी आभार मानले.