जळगाव ः प्रतिनिधी
जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पारा 43.2 अंशांवर होता. पूर्वमोसमी पावसाचे ढग घोंगावत असताना मंगळवारपासून उत्तर महाराष्ट्रात तीव्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 30 एप्रिलपर्यंत ढगाळ वातावरणासह ही लाट कायम राहणार आहे.
उत्तर महाराष्ट्रात 26 एप्रिलपासून उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार आहे. राज्यात सर्वाधिक तापमान जळगाव जिल्ह्यात विदर्भानंतर आता उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची तीव्रता वाढणार आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये तापमान 45 अंशांवर जाईल अशी शक्यता आहे. याच काळात विजांच्या कडकडाटासह पूर्वमोसमी पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सोमवारपासून पुढील पाच दिवस जिल्ह्याच्या उष्णतामानात वाढ होण्याची पूर्वसूचना प्रादेशिक हवामान विभाग मुंबईने जिल्हा प्रशासनाला दिली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.