मुंबई : प्रतिनिधी
कोविडच्या आपत्तीमुळे अनेक अडचणी असूनही जळगाव जिल्ह्यात तापी नदीवरील खेडी व भोकर या दोन गावांना जोडणार्या पुलाच्या कामांसाठी तब्बल १५२ कोटी रूपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे अशी माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी तापी नदीवरील खेडी-भोकरी ते भोकर दरम्यान पूल बांधण्याचे आश्वासन दिले होते. या अनुषंगाने कोविडची आपत्ती सुरू असतांनाही मंत्रालयात तीन उच्च स्तरीय बैठका झाल्या. यात जुलै महिन्यातील बैठकीत या पुलाच्या बांधकामाला जलसंपदा मंत्री जयंत पाटील व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतलेल्या बैठकीत १५२ कोटी रूपयांच्या कामाला तत्वत: मान्यता देण्यात आलेली होती.तसेच यात जलसंपदा व सार्वजनीक बांधकाम या दोन्ही खात्यांच्या खर्चाचा नेमका किती वाटा असेल, याबाबत दोन्ही खात्याच्या सचिवांनी निर्णय घेण्याचे सुचविण्यात आले होते. या अनुषंगाने जलसंपदा खात्याने दिनांक २ फेब्रुवारीच्या पत्राच्या माध्यमातून दोन्ही खात्यांनी प्रत्येकी ५० टक्के इतका भार उचलावा असे सूचित केले आहे. यामुळे आता या पुलाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अनेक दशकांपासूनची मागणी
तापी नदी पुलावरील खेडी-भोकर या दोन गावांना जोडणार्या पुलाचा प्रश्न गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबीत असून परिसरातील हजारो शेतकरी आणि सर्वसामान्य ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. वास्तविक पाहता, खेडी- भोकर ते चोपडा हे अंतर फक्त १५ किलोमीटरचे आहे. मात्र, तापी नदीवरील पुलाअभावी हे अंतर ७० किलोमीटरचे होते.परिणामी शेतकर्यांचा व नागरिकांचा वेळ व पैसा देखील खर्च होतो. शिवाय खेडी भोकर, भादली, कठोरा, किनोद, गोरगावले, गाढोदे, करंज, सावखेडा आदी गावातील शेतकर्यांना ये- जा करण्यासाठी सध्या दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. हा पूल झाल्यानंतर चोपडा मार्गे शिरपूरला जाणेही सोयीचे होणार आहे. आजवर जानेवारी ते जून या कालावधीत तापी नदीवर उभारण्यात येणार्या तात्पुरत्या पुलामुळे थोडी सुविधा होत असली तरी उर्वरित सहा महिने फेरा चुकविता (पान २ वर)
असा असेल पूल
तापी नदीवरील खेडी-भोकरी ते भोकर दरम्यानचा पूल हा उंच पूल असून तब्बल ६०० मीटर लांब असून यात प्रत्येकी ३० मीटरचे २२ गाळे असणार आहेत.सदर पुलाच्या दोन्ही बाजूस सुमारे ६५० मीटर लांबीचे पोहोच रस्ते असतील. दोन्ही बाजूला भराव टिकवून ठेवण्याकरिता बॉक्स रिटर्न व पाईल फाउंडेशनसह रिटेनिंग वॉल असणार आहे. स्टील रेलिंग रोडसाइड फर्निचर व इतर अनुषंगिक बाबींचा यात समावेश आहे.