जळगाव : प्रतिनिधी
शहरातील रेल्वे स्टेशनजवळच असलेल्या नवीपेठ परिसरात एका घरात चोरी झाल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले आहे. लोखंडी खिडकीचे गज वाकवून चोरट्यांनी अंदाजे 16 ते 18 लाखांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली आहे.
नवीपेठ परिसरात पत्र्या हनुमान मंदिर समोर बॉम्बे लॉजच्या गल्लीत राजू गोविंद अग्रवाल (वय 52) हे परिवारासह वास्तव्यास आहेत. त्यांचा मोबाईल रिपेअरिंगचा व्यवसायातून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दि.24 मार्च रोजी ते दुपारी पुणे येथे मुलगा अखिल अग्रवाल याच्याकडे गेले होते. तत्पूर्वी त्यांची बहीण सुरेखा नंदू भावसार या दुबई येथे मुलाकडे जाणार असल्याने त्यांनी सोन्याचे दागिने राजू अग्रवाल यांच्या घरी ठेवले होते.
चोरट्यांनी रेल्वेच्या बाजूने येत लोखंडी खिडकीचे गज वाकवून काचेची खिडकी फोडत घरात प्रवेश केला.
बुधवारी अग्रवाल कुटुंबीय घरी आले असता घडलेला प्रकार त्यांच्या लक्षात आला. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड, उपनिरीक्षक जगदीश मोरे, सर्जेराव क्षीरसागर, कर्मचारी योगेश बोरसे, योगेश पाटील, रतन गिते, तेजस मराठे, प्रणेश ठाकूर, अक्रम शेख, संजय हिवरकर, मोरे यांच्यासह एलसीबीचे विजयसिंग पाटील, राजेश मेढे, अविनाश देवरे आदी पोहचले आहेत. श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञ यांनी पाहणी केली आहे.