‘Hotel Royal Palace’ In Jalgaon : जळगावातील ‘हॉटेल रॉयल पॅलेस’वर एलसीबीच्या पथकाचा छापा

0
12

एलसीबीच्या कारवाईत १३ मोबाईल, लाखोंच्या रोकडसह आठ जणांना अटक

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

शहरातील जयनगरातील सागरपार्क मैदानाजवळील हॉटेल रॉयल पॅलेसमध्ये गुरुवारी, १० जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून जुगाराचा मोठा अड्डा उद्ध्वस्त केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या जुगाराच्या सत्रावर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने सर्वात मोठी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हॉटेलमध्ये धाड टाकून कारवाई केली आहे. कारवाईत १९ लाख ९७ हजार रुपये रोख, १३ मोबाईल फोनसह आठ जुगाऱ्यांना रंगेहाथ अटक केली असल्याचेही पोलिसांनी सांगितले. दरम्यान, अशा धडक कारवाईमुळे जळगावमधील जुगार खेळणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

सविस्तर असे की, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना हॉटेल रॉयल पॅलेसमधील रूम क्रमांक २०९ मध्ये काही व्यक्ती तीन पत्ती (झन्ना मन्ना) नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती १० जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मिळाली होती. हॉटेलमधील २०९ क्रमांकाचा रुम मदन लुल्ला यांच्या नावावर आरक्षित असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर श्री.पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, स.फौ. अतुल वंजारी, पो.हे.कॉ. अक्रम शेख, नितीन बाविस्कर, प्रवीण भालेराव, संदीप चव्हाण, पो.ना. किशोर पाटील, पो.कॉ. रवींद्र कापडणे यांच्या पथकाने कारवाईची योजना आखली. पथकाने ११ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेलवर छापा टाकला. चौकशीअंती खोली मदन लुल्ला यांच्या नावावर बुक असल्याचे निष्पन्न झाले. तपासणी दरम्यान ८ जणांना जुगार खेळताना अटक केली.

रामानंदनगर पोलीस ठाण्यात आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल

अटक केलेल्यांमध्ये पप्पु सोहम जैन (वय ३२, रा. बळीराम पेठ), भावेश पंजोमल मंधान (३७, रा. सिंधी कॉलनी), मदन सुंदरदास लुल्ला (४२, रा. गणपती नगर), सुनील करलाल वालेचा (४०, रा. सिंधी कॉलनी), अमित राजकुमार वालेचा (४५, रा. गणेश नगर), विशाल दयानंद नाथानी (४८, रा. गायत्री नगर), कमलेश कैलाश सोनी (३६, रा. वाघुळदे नगर, पिंप्राळा रोड), रुखील (३२, रा. जळगाव) अशा ८ जणांचा समावेश आहे. दरम्यान, याप्रकरणी सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here